

अनुराधा कदम
कोल्हापूर : महिलांच्या सक्षमीकरणाच्या घोषणा आणि सुरक्षेसाठी विविध कायदे अस्तित्वात असतानाही महिलांवरील अत्याचारांचे सत्र थांबलेले नाही. महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात महिलांविरोधातील गुन्ह्यांत तब्बल ४ हजार ३० प्रकरणांची वाढ झाली आहे. मार्चअखेर दोन हजारहून अधिक तक्रारी प्रलंबित असून, गत ४ वर्षांत ३ हजारांहून अधिक महिलांचा हुंडापायी छळ झाला आहे.
महिलांच्या न्यायासाठी कार्यरत राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद गेल्या ७ महिन्यांपासून रिक्त असून, सहा अशासकीय सदस्यांची पदेही भरलेली नाहीत. त्यामुळे महिलांना न्याय देणारी यंत्रणाच नेतृत्वाविना असल्याचे चित्र आहे. हुंड्यासाठी छळ, कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार आणि विवाहित महिलांचा मानसिक छळ अशा घटनांनी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनवला आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवाल २०२५-२६ नुसार, राज्यात महिलांविरोधातील गुन्ह्यांची संख्या २०२४ मध्ये ४६,३२० होती. ती २०२५ मध्ये ५०,३५० वर पोहोचली. बलात्काराच्या घटनाही २०२३ मधील ७,५२४ वरून २०२५ मध्ये ८,६४३ झाल्या आहेत.
हुंड्याच्या हव्यासातून महिलांचे बळी
राज्यात २०२३ मध्ये १७०, २०२४ मध्ये १३९, तर २०२५ मध्ये १३८ हुंडाबळींची नोंद झाली. मार्च २०२६ अखेर २७६१ तक्रारी प्रलंबित आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत १२ हुंडाबळीची प्रकरणे समोर आली आहेत. पैशांसाठी तगादा, माहेराहून दागिने-वस्तू आणण्याचा दबाव आणि मुलगी झाल्याने टोमणे मारणे अशा छळाचे प्रकार अद्याप सुरूच आहेत.
महिला आयोगाची पदे रिक्त
माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर २० मार्च २०२६ पासून अध्यक्षपद रिक्त आहे. सहा अशासकीय सदस्यांची पदेही जानेवारी २०२५ पासून रिक्त आहेत. मार्च २०२६ अखेर आयोगाकडे २ हजार ७६१ तक्रारी प्रलंबित होत्या. महिलांविरोधातील गुन्हे वाढत असताना आयोगाच्या नियुक्त्यांबाबतचा विलंब आणि तक्रारींचा प्रलंबित भार यामुळे महिलांना न्याय मिळण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी केवळ कायदे करून चालणार नाही, तर त्यांची प्रभावी अंमलबजावणी आणि तक्रारींचे वेळेत निवारण करणारी सक्षम यंत्रणाही आवश्यक आहे. महिला आयोगाच्या नियुक्त्या तातडीने करून महिलांना न्यायासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
अनिता काळे, समुपदेशक