

CJI B. R. Gavai Kolhapur Circuit Bench opening ceremony
कोल्हापूर : कोल्हापूर सर्किट बेंचचे रुपांतर लवकरच खंडपीठात होईल, मी तर कोल्हापूर सर्किट बेंच म्हणणे बंदच करतो. मी खंडपीठच म्हणेन. मुंबई न्यायालयाचे न्या. आलोक आराधे यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हाला कोल्हापुरकरांचा, शाहू महाराजांचा, महालक्ष्मीचा आशिर्वाद मिळेल. त्यांच्या निवृत्तीला किती दिवस उरले आहेत मला माहिती नाही.
पण त्यांनी लवकरात लवकर सर्किट बेंचचं कायमस्वरूपी बेंच कसे होईल, याकरीता प्रस्ताव पाठवावा. माननीय मुख्यमंत्र्यांकडून त्याला निश्चित्त योग्य प्रतिसाद मिळेल, असे सूचक वक्तव्य सरन्यायाधीश बी. आर. तथा भूषण गवई यांनी केले.
कोल्हापूर सर्किट बेंच उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यावर सोहळ्यात उपस्थित नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. माझ्याकडे सव्वा तीन महिन्यांचा कालखंड आहे तो मी कमी समजत नाही. गेल्या तीन महिन्यात मी देशभरातील उच्च न्यायालयात 50 नियुक्त्या केल्या आहेत, असेही ते म्हणाले.
सरन्यायाधीश गवई म्हणाले, हा स्वप्नपूर्तीचा दिवस. 40-45 वर्षांपुर्वी ज्यांनी हे स्वप्न पाहिले त्या स्वप्नपुर्तीत आम्ही सहभागी झालो. अस्पृश्यतेविरोधात शाहु महाराजांचा लढा सर्वांनाच माहिती आहे. राज्याभिषेकानंतर त्यांनी पहिला जाहिरनामा केला त्यात वाक्य होते की, आपल्याला मिळालेला अधिकार हा उपभोग घेण्यासाठी नसून रंजल्या गांजलेल्यांच्या उद्धारासाठी आहे.
त्याच विचाराला अनुसरून वकील, हायकोर्ट जज आणि सरन्यायाधीश म्हणून काम करत आहे. पद हे अधिकार गाजवण्यासाठी नाही तर नियतीने दिलेली सेवेची संधी आहे. शाहू महाराजांनी 50 टक्के आरक्षण मागास जातींना दिले. मोफत शिक्षणाचा कायदा केला.
वसतीगृहे स्थापन केली. जातीभेद दूर करण्यासाठी दलिताला हॉटेल उघडण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्या हॉटेलमध्ये स्वतः चहा पिण्यासाठी गेले. विधवांना पुनर्विवाहचा कायदा केला. त्यांचा जन्मदिवस आपण देशभर सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करतो.
यावेळी सरन्यायाधीशांनी राजर्षी शाहु महाराजांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव करणारी एक कविता सादर केली. ते म्हणाले, बाबासाहेब आंबेडकरांच्या जडणघडणीत शाहू महाराजांचे मोठे योगदान आहे. आंबेडकरांच्या आर्थिक अडचणीत शाहू महाराजांनी स्कॉलरशिप देऊन त्यांना परदेशात पाठवले.
देवेंद्र फडणवीस यांनी आंबेडकर राहत असलेल्या लंडनमधील घराचे स्मारकात रुपांतर केले आहे. आंबेडकरांना मूकनायक वृत्तपत्र सुरू करण्यासाठी शाहू महाराजांनी 3000 रुपयांची मदत केली. शाहू महाराज म्हणाले होते की, तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढला.
माझी खात्री आहे, आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. ते एकदिवस देशाचे पुढारी होतील. शाहू महाराजांचे भाकीत खरे ठरले. शाहू महाराज, आंबेडकरांना आपण दैवत मानतो. शाहू महाराजांचे वंशज खा. शाहू महाराज यांनी माझे स्वागत केले हे मी विसरू शकणार नाही.
आज करवीर नगरीत शाहू महाराजांच्या नगरीत सर्किट बेंचचे रुपांतर लवकरच खंडपीठात होणार आहे. काल कोल्हापुरात आलो तेव्हा सर्वत्र होर्डिंग लागल्याचे पाहिले. राजकीय नेत्यांचे. काही होर्डिंगवर माझा आणि आराधे साहेबांचाही फोटो होता.
आराधे साहेब जेव्हा राज्याचे मुख्य न्यायाधीश झाले. तेव्हा त्यांना मी म्हटलो की तुम्हाला हे काम करावं लागणार आहे. त्यांनी कमिटी स्थापन केली. कमिटीने रिपोर्ट दिला. नागपूरच्या एका कार्यक्रमात आमची बैठक झाली आराधे साहेबांना चिंता होती की होईल की नाही. देवेंद्रजी म्हणाले की होईल.
त्याचवेळी ठरले की सहा जिल्ह्यातील नागरिकांना न्यायासाठी दूर जावे लागते ही समस्या दूर करण्यासाठी 16 ऑगस्ट तारीख ठरवली. त्यानंतर ठरले की 17 ऑगस्ट ठरवली गेली. तत्पुर्वी 5 जुलैला मुंबईत झालेल्या बैठकीत चर्चा झाली. संग्राम देसाईंनी फोनवर सांगितले की, जुने डिस्ट्रिक्ट कोर्ट चांगले आहे तिथे काम होऊ शकते. कर्णिक साहेब कुणाला न सांगता येथे आले, त्यांनी जागा पाहून रिपोर्ट पाठवला की येथे कोर्ट स्थापन केले जाऊ शकते.
काही जणांना वाटत होते की, ज्युडिशिल इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण होईल की नाही. पण देवेंद्रजींनी सांगितले की, काही चिंता करू नका, 15 ऑगस्टच्या आधी काम करू. महाराष्ट्र सरकारने, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे, त्यांचे मंत्रालय यांनी अशक्य ते शक्य करून दाखवले. गिनीज बूक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद करावी अशी ही बाब आहे.
20-25 दिवसांत हे काम त्यांनी केली. जुनी भव्यता कायम ठेऊन त्यांनी सर्किट बेंचची इमारत सुंदर केली. ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामात महाराष्ट्र मागे आहे म्हणणाऱ्यांना हे प्रत्युत्तर आहे.
एक ऑगस्टला मी दिल्लीहून नागपूरला जात होतो. माजी खासदार संभाजीराजे मागच्या रांगेत बसलो होतो. तुम्ही पहिले व्यक्ती आहात की ज्यांना मी सांगत आहे की, कोल्हापूर सर्किट बेंच नोटिफाय झाले आहे. त्यांनी विमानात माझ्यासोबत फोटो काढला आणि ते उतरल्यानंतर कुणीतरी मला त्यांचे ट्विट दाखवले.
आराधे साहेबांनी नोटिफिकेशन काढले नसते तर बेंच होऊच शकला नसता. मकरंद कर्णिक आणि विलास गायकवाड यांसह बाकी सर्वांचे जाहीर कौतूक आणि आभार. त्यांच्या प्रयत्नांमुळेच कोल्हापूर बेंचचे स्वप्न पूर्ण होत आहे. मी खंडपीठच म्हणेन सर्किट बेंच म्हणणे बंद करतो. ज्या ज्या वेळी कोल्हापुरची मागणी झाली तेव्हा औरंगाबादचे खंडपीठ समोर होते.
औरंगाबाद खंडपीठाने सिद्ध करून दाखवले. त्या खंडपीठाने अनेक न्यायाधीश दिले. आताही सहा जिल्ह्यातील वकीलांसाठी मोठी संधी आपण निर्माण केली आहे. 200 वर वकील मुंबईतून कोल्हापूरात येणार आहेत.
पुढच्या दहा वर्षात या खंडपीठातून उच्च न्यायालयात न्यायाधीश निर्माण होतील. होतकरू वकीलांना संधी मिळेल. होतकरू वकीलांच्या हॉस्टेलसाठी एक एकर जागा द्या, अशी मागणी काहींनी केली होती. त्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक विचार करतील. ग्रामीण भागातील वकीलांसाठी मोठी संधी निर्माण होणार आहे. 27 एकर जमिन दिली आहे. तेवढी जागा पुरणार नाही.
कालपासून कोल्हापुरने जे प्रेम माझ्यावर केलेय. ते मी विसरू शकत नाही. डी. वाय. पाटील माझ्या वडिलांचे मित्र आहेत. त्यांचे पुत्र सतेज पाटील आमच्या ताफ्यावर पुष्पवर्षाव करत होते. मी आज या पदावर पोहचलो तो बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे. बाबासाहेबांना घडविण्यात शाहू महाराजांचे मोठे योगदान आहे.
त्या शाहू महाराजांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. त्या उपकारांची परतफेड करण्यात खारीचा वाटा उचलण्याची संधी दिली आणि मला आज बोलावले ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. 14 मे 2025 साली (सरन्यायाधीश होताना) जेवढा आनंद झाला होता त्यापेक्षा जास्त आनंद आज झाला.
सरन्यायाधीश गवई म्हणाले, या सहा जिल्ह्यातील शेवटच्या माणसाला शाहू महाराज, आंबेडकरांना अभिप्रेत असलेला न्याय देण्याचे काम व्हावे, यासाठी शुभेच्छा देतो. अजितदादा नाहीत येथे नाहीतर कोल्हापूर टु पुणे एक्सप्रेसवे बांधून टाका अशी विनंती त्यांना केली असती.
पुण्याचे वकील माझ्याकडे आले होते ते म्हणाले होते की, आम्हाला पाठिंबा द्या. मी म्हटले वडीलांनी शिकवलंय की, कुणाचे नुकसान करायचे नाही. त्यांच्याकडे 4-5 हजार वकील झाले आहेत म्हणून त्यांची मागणी होती. मी म्हटले विचार वकीलांचा नाही तर नागरिकांचा करायचा, असेही गवई यांनी सांगितले.