

Kolhapur Circuit Bench Notification
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील लाखो नागरिकांसाठी दशकांहून अधिक काळ चाललेला संघर्ष अखेर फळाला आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच (खंडपीठ) कोल्हापुरात 18 ऑगस्ट 2025 पासून कार्यान्वित होणार असल्याची बहुप्रतिक्षित घोषणा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांनी आज (शुक्रवार 1 ऑगस्ट 2025) एका अधिसूचनेद्वारे केली.
या ऐतिहासिक निर्णयामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, न्यायदानाचा मार्ग आता अधिक सुकर होणार आहे. दैनिक पुढारीने कोल्हापूर खंडपीठाचा प्रश्न अनेक वर्षांपासून लाऊन धरला होता.
संघर्षाला मिळाले यश
गेली अनेक वर्षे पश्चिम महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, यासाठी तीव्र मागणी जोर धरत होती. सर्वसामान्यांना न्याय मिळवण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून मुंबई गाठावी लागत होती. यात वेळ, पैसा आणि श्रमाचा प्रचंड अपव्यय होत असे.
अनेकदा केवळ तारखांसाठी मुंबईला जावे लागत असल्याने पक्षकारांचे मोठे हाल होत होते. या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनसह विविध सामाजिक संघटनांनी आणि राजकीय नेत्यांनी वेळोवेळी आंदोलने, मोर्चे आणि शासनाकडे अथक पाठपुरावा केला होता. या सर्व प्रयत्नांना आणि संघर्षाला आज यश आले आहे.
अधिसूचनेत काय म्हटले आहे?
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, कोल्हापूर येथील सर्किट बेंचचे कामकाज सोमवार, दिनांक 18 ऑगस्ट 2025 पासून अधिकृतपणे सुरू होईल.
दरम्यान, या खंडपीठाच्या कार्यकक्षेत कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील दिवाणी आणि फौजदारी प्रकरणे चालवली जातील.
सुरुवातीच्या टप्प्यात आवश्यकतेनुसार न्यायाधीश आणि कर्मचारी वर्ग येथे कार्यरत असेल. कामकाजाच्या सोयीसाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यात आली असल्याचेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
संभाजीराजे यांची प्रतिक्रिया
माजी खासदार संभाजीराजे यांनी पोस्ट केली आहे की, आज दिल्ली येथून नागपूरला हवाई प्रवास करत असताना योगायोगाने भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे व माझे विमानातील आसन लगतच होते. यावेळी भेट होताच माननीय सरन्यायाधीश महोदय अत्यंत आनंदाने मला म्हणाले की, “राजे, पहिली आनंदाची बातमी तुम्हालाच देतो, कोल्हापूरचे खंडपीठ… सर्किट बेंच आजच नोटिफाय झालेले आहे.”
अगदी अचानक खुद्द देशाच्या सरन्यायाधीश महोदयांनीच दिलेली ही आनंदवार्ता ऐकून मन क्षणभर स्तिमित झाले. गेल्या अनेक वर्षांचा कोल्हापूर जिल्ह्यातील वकील बांधवांचा खंडपीठासाठीचा सातत्यपूर्ण लढा डोळ्यांसमोर तरळला. मी खासदार असताना केंद्रीय स्तरावर केलेला पाठपुरावा नजरेसमोरून गेला. अखेर या अनेक वर्षांच्या लढ्याला यश आल्याचे समाधानही मिळाले आणि खुद्द सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांकडून ही आनंदवार्ता ऐकायला मिळाली, याचेही मनोमन समाधान व हर्ष वाटला…
या खंडपीठासाठी लढा दिलेले वकील बांधव व सर्व कोल्हापूरकर व पश्चिम महाराष्ट्रातील जनता यांचे मन:पूर्वक अभिनंदन !
न्यायवर्तुळात आनंदाचे वातावरण
या घोषणेनंतर कोल्हापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील वकील आणि नागरिकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. "हा केवळ एक प्रशासकीय निर्णय नसून, लाखो लोकांच्या भावनांचा आणि संघर्षाचा विजय आहे," अशी प्रतिक्रिया कोल्हापुरातून व्यक्त होत आहे.
आता स्थानिक पातळीवरच न्याय मिळणार असल्याने प्रलंबित खटल्यांचा निपटारा वेगाने होईल आणि सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल."
न्यायव्यवस्थेसाठी मैलाचा दगड
कोल्हापुरात सर्किट बेंच सुरू होणे हा पश्चिम महाराष्ट्राच्या न्यायालयीन इतिहासातील एक सुवर्ण क्षण आहे. यामुळे केवळ पक्षकारांची सोय होणार नाही, तर स्थानिक पातळीवर वकिलांना कामाची मोठी संधी उपलब्ध होईल.
न्याय मिळवण्यासाठी होणारा विलंब आणि खर्च टाळता येणार असल्याने हा निर्णय खऱ्या अर्थाने 'न्याय सर्वांसाठी' या संकल्पनेला मूर्त रूप देणारा ठरणार आहे. या निर्णयामुळे न्याय आता सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे, हे निश्चित.