Madhuri Elephant News : ‘माधुरी हत्तीणी’च्या ‘नांदणी’वापसीचा मार्ग मोकळा! पण कायद्याचा अडसर; पालकमंत्री आबिटकरांची माहिती

'वनतारा' संस्थेने कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी परिसरात आपले एक युनिट सुरू करण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली आहे.
kolhapur news madhuri elephant cleared for return to nandani but legal hurdles remain says minister prakash abitkar
Published on
Updated on

कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या माधुरी हत्तीणीच्या पुनरागमनाबाबत एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे. जनभावनांचा आदर करत ‘वनतारा’ संस्था माधुरीला कोल्हापुरात परत पाठवण्यासाठी सकारात्मक आहे, मात्र जोपर्यंत संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत तिचे पुनरागमन शक्य होणार नाही, असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज (दि.1) स्पष्ट केले.

माधुरी हत्तीणीच्या मुद्द्यावर पालकमंत्री आबिटकर यांनी 'वनतारा' संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेनंतर त्यांनी माध्यमांना ही माहिती दिली. ते म्हणाले की, ‘वनतारा संस्थेच्या सीईओंनी करवीर मठाच्या महास्वामींना स्पष्टपणे सांगितले आहे की, माधुरीला कोल्हापुरातून नेण्याच्या संपूर्ण प्रकरणात वनताराचा कोणताही थेट संबंध नाही. मात्र, कोल्हापूरकरांच्या भावना तीव्र आहेत आणि याचा आदर करून आम्ही माधुरीला परत देण्यास तयार आहोत.’

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य

वनतारा संस्था माधुरीला परत देण्यास तयार असली तरी, या हस्तांतरणासाठी आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करणे बंधनकारक आहे. यामध्ये न्यायालयाचे निर्देश आणि वनविभागाच्या परवानग्या यांचा समावेश आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय माधुरीला कोल्हापुरात आणता येणार नाही, असेही आबिटकर यांनी नमूद केले. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर या प्रक्रियेला गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

नांदणी परिसरात 'वनतारा'चे युनिट?

या चर्चेदरम्यान एका सकारात्मक मुद्द्यावरही चर्चा झाली. 'वनतारा' संस्थेने कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी परिसरात आपले एक युनिट सुरू करण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली आहे. जर हे युनिट सुरू झाले, तर भविष्यात प्राण्यांच्या संगोपनासाठी आणि उपचारांसाठी एक मोठी सोय उपलब्ध होऊ शकेल. या प्रस्तावामुळे माधुरीच्या प्रकरणातून एक विधायक मार्ग निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रकरणाचे राजकारण करू नये - पालकमंत्री

माधुरी हत्तीण हा कोल्हापूरकरांसाठी एक भावनिक विषय आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून कोणीही राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सर्व राजकीय पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना केली आहे. ते म्हणाले, ‘हा विषय राजकारणाचा नाही, तर भावनांचा आहे. सर्वांनी एकत्र येऊन सामंजस्याने हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.’

एकंदरीत, माधुरीच्या पुनरागमनासाठी प्रशासकीय आणि कायदेशीर पातळीवर हालचालींना वेग आला असला तरी, कोल्हापूरकरांना आपल्या लाडक्या माधुरीसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे, हे निश्चित.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news