

चंदगड (जि. कोल्हापूर) : संदीप तारिहाळकर
ऐन फळधारणेच्या काळात सर्वाधिक धुक्यांचे प्रमाण, अवकाळी पाऊस आणि प्रचंड उष्मा अशा विचित्र वातावरणामुळे इतिहासात पहिल्यांदाच काजू उत्पादनात 65 टक्के इतकी घट झाल्याचा अहवाल कृषी खात्याच्या कृषी शास्त्रज्ञांनी राज्य शासनाला दिला आहे. त्यानंतर राज्य सरकारने कोकण विभागातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 22 हजार रुपयांची मदतीची घोषणा केली. मात्र, कोकण विभागाला लागून असणाऱ्या चंदगड, आजरा, भुदरगड व गडहिंग्लज तालुक्यांमधील काही गावांचा विचार शासनाने केलाच नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
चंदगड तालुक्यात 8 हजार 500 हेक्टर इतक्या क्षेत्रावर काजू लागवड आहे. थोड्याफार कमी प्रमाणात आजरा, भुदरगड तालुक्यात ही लागवड आहे, तर गडहिंग्लज तालुक्यातील काही गावांचा यामध्ये समावेश आहे. यंदा जानेवारी, फेब्रुवारी या कालावधीमध्ये काजू झाडाला मोहोर येतो. याच काळामध्ये काही दिवस थंडी, काही दिवस धुके आणि अचानकपणे प्रचंड उष्मा, अशा विचित्र वातावरणामुळे मोठा परिणाम
झाला. चंदगड तालुक्यातील 150 गावे व वाड्या-वस्त्या आहेत, यापैकी 30 गावे वगळता सर्व गार्वामधून काजू उत्पादन घेतले जाते. दरवर्षी हजारो टन काजू उत्पादन आणि यातून कोट्यवधींची उलाढाल होते. मात्र, यंदा उत्पादनात सरासरी 65 टक्के घट झाल्याने येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे.
हंगाम अखेरच्या टप्प्यात असल्याने बाजारपेठेत काजूची आवकही नाही. परिणामी, स्थानिक प्रक्रिया उद्योगांना आवश्यक तितक्या काजूचा पुरवठा होत नाही. चंदगड तालुक्यात 250 हून अधिक काजू प्रक्रिया उद्योग आहेत. यावर हजारो महिला कामगार अवलंबून आहेत. अपेक्षित उत्पादन झाल्याने पतसंस्था बँकाकडील व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक नव्या काजू प्रक्रिया उद्योग आणि उद्योजकांनी बँकांकडून कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केले आहेत. त्यांची ही आर्थिक कोंडी होत आहे.
निम्मे प्रक्रिया उद्योग बंद
एकट्या चंदगड तालुक्यात 250 हून अधिक प्रक्रिया काजू प्रक्रिया उद्योग आहेत. मात्र, सध्या स्थानिक काजू उत्पादनात घट, शिवाय युद्धजन्य परिस्थितीमुळे आयात होणाऱ्या काजू बी वाहतुकीचा प्रचंड खर्च तसेच युद्धजन्य परिस्थितीमुळे तयार काजूच्या निर्यातीत प्रचंड घट, यामुळे पर्यायाने काजू उद्योग ही संकटात आला आहे
तीन कृषी शास्त्रज्ञांच्या वतीने चंदगड तालुक्यात काजू उत्पादन घटण्यासंदर्भात प्रत्यक्ष बांधावर जाऊन सर्व्हे केला. तालुक्यात 60 ते 65 टक्के काजू उत्पादनात झालेली घट, हा कृषी शास्त्रज्ञांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठवला आहे, मदतीसंदर्भात घोषणा झाली तर सर्व्हे करून पुढील कार्यवाही करू.
- विवेकानंद चव्हाण, तालुका कृषी अधिकारी, चंदगड
कोकण विभागात नुकसानीमुळे हेक्टरी 22 हजारांचे अनुदान जाहीर झाले आहे. हाच निकष चंदगड, आजरा भुदरगड व अन्य ठिकाणी लागू व्हावा. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काजू उत्पादकांना मदत मिळवून देऊ.
- आ. शिवाजी पाटील, चंदगड विधानसभा मतदार संघ