

Cashew-growing farmer critically injured in gaur attack
चंदगड : पुढारी वृत्तसेवा
काजूच्या बागेमध्ये काजू वेचत असताना साक्षात गवा रेडा समोर आला. यावेळी आक्रमक झालेल्या गवा रेड्याला काही सेकंद त्या शेतकऱ्याने झुलवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काजू वेचणारा शेतकरी बालंबाल बचावला. मात्र शिंगाने मारल्याने शेतकऱ्याच्या डोक्याला जखम झाली. मात्र हा शेतकरी सुदैवाने बचावला. ही घटना गुरुवारी (दि. २३) घडली. बेळगाव तालुक्याच्या सीमेला लागून असणाऱ्या सुरूते (ता. चंदगड) येथील मुंगू तळे नावाच्या शेतात ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, काजू उत्पादक शेतकरी परशुराम धाकलू मरगाळे (वय ५२) हे गुरुवारी सकाळी 11 गावाशेजारी असणाऱ्या मुंगू तळे जवळील शेतातील काजू बागेत गेले होते. भर दुपारी बारा वाजता काजूच्या झाडाजवळ काजू वेचत असताना झुडपातून अचानकपणे समोर गवा हळुवारपणे येऊन ठाकला. तो शिंग हलवत आक्रमक झाला होता.
यादरम्यान त्या शेतकऱ्यानेही काही सेकंद त्या गवा रेड्याला झुलवत ठेवले. या दरम्यान त्या गवा रेड्याचे शिंग डोकीला घासून गेले. डाव्या डोळ्याला ही काही प्रमाणात मार लागला. सुदैवाने तो गवा तिथून माघारी फिरला. यानंतर लागलीच परशराम यांना तुडीये (ता. चंदगड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
यादरम्यान वन अधिकाऱ्यांनी त्या शेतकऱ्याच्या घरी भेट देऊन प्राथमिक उपचाराचा खर्च दिला आहे. मुंगू तळेजवळ एक शेततळे आहे. या तळ्याचे पाणी पिण्यासाठी शेजारी असलेल्या माडवळे जंगलातून शिवारात येत आहेत. अशाच प्रकारे आलेल्या गवा रेड्याने हा हल्ला केला. केवळ नशीब बलवत्तर म्हणूनच हा शेतकरी या घटनेतून बचावला.
जंगलातील गवा रेड्यांची पाण्यासाठी भटकंती
जंगलात पाण्याचा तुटवडा जाणवू लागल्याने गवा रेडे हे शेतात असणाऱ्या शेततळ्यामधील पाणी पिण्यासाठी येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. वनखात्याने त्वरित जंगलात वन्य प्राण्यांसाठी शेततळी मारून पाणी उपलब्ध करून द्यावे, अन्यथा भविष्यात शेतकऱ्यांचे बळी जाणार, अशी भीती व्यक्त होत आहे. भर दुपारी ही घटना घडल्याने शिवारात काजू वेचण्यासाठी एकट्या दुखट्याने जाणे बंद झाले आहे.