सरुड : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यातील ४३० गावांमध्ये ग्राम पंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी रविवारी सकाळपासून मतदान प्रक्रिया गतिमान झाली असताना तालुक्याचे ठिकाण असणाऱ्या शाहूवाडी-चनवाड या गावात मात्र निरव शांतता आहे. शासन निर्णयाप्रमाणे येथील ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाले नसल्याने येथील ग्रामस्थांनी प्रारंभापासूनच संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकला आहे. ग्रामस्थांना विश्वासात न घेता किंबहुना त्यांचा हा विरोध दुर्लक्षित करून प्रशासनाने येथील ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम एकतर्फी लादल्याचा आरोप सर्वपक्षीय कृती समितीने केला आहे.
'ग्रामपंचायत नको नगरपंचायत हवी' असा नारा देत येथील राजकीय गटातटात विभागलेल्या कार्यकर्त्यांसह सर्वच ग्रामस्थांनी या निवडणुकीसाठी प्रशासनाशी असहकार पुकारून एकीचे दर्शन घडविले आहे. अर्थातच शाहूवाडीकरांनी 'आर या पार'च्या इराद्याने नगरपंचायतची मागणी उचलून धरल्याचे स्पष्ट दिसत आहे. 'दै. पुढारी' ने देखील या ग्रामस्थांची भूमिका लोकप्रतिनिधी, शासन आणि प्रशासनापुढे मांडण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे.
विशेष म्हणजे, सद्यस्थितीत जिल्ह्यात एकमेव शाहूवाडी-चनवाड (ग्रुप) ग्राम पंचायत निवडणुकीसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. कोणत्याही निर्णयाला समर्थक आणि विरोधक अशा दोन बाजू असतात. याचा विचार करता निवडणुकीत एखाद दुसरा अर्ज दाखल झाला असता तर शाहूवाडीकरांच्या निर्धाराला तडा गेला असता. मात्र अपेक्षेप्रमाणे एकही अर्ज दाखल न झाल्याने सर्वपक्षीय कृती समितीचा विश्वास आणखी दुणावला आहे.
राज्य सरकारकडून तालुका ठिकाणच्या गावांना नगरपंचायत देण्याचा निर्णय (नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ अंतर्गत तरतुदीनुसार) मार्च २०१३ मध्ये जाहीर केला होता. त्याची महाराष्ट्र शासनाने ५ फेब्रुवारी २०१५ च्या राजपत्रात (असाधारण भाग गट अ) उद्घोषणा केली होती. स्वाभाविकपणे शाहूवाडी-चनवाड ग्रुप ग्रामपंचायतीला नगरपंचायत दर्जा प्राप्त झाल्याचा ग्रामस्थांचा समज झाला. मात्र २०१७ मध्ये ग्रामपंचायत म्हणूनच प्रशासनाने येथे निवडणूक कार्यक्रम राबविला. यात गाफीलपणामुळे तोंडघशी पडलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांना परस्पर सल्लामसलत करण्यास वाव मिळाला नाही. अशा गोंधळाच्या परिस्थितीतच सारेजण जाहीर ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे गेले.
येथून पुढे शाहूवाडी-चनवाड ग्रुप ग्रामपंचायतीचा 'नगरपंचायत दर्जा' शासनाच्या लालफितीत अडकून पडण्यास प्रारंभ झाला. जो प्रश्न बनून आजअखेर लटकलेलाच आहे. ही झालेली अक्षम्य चूक सुधारण्याची संधी म्हणूनच शाहूवाडीकरांनी विद्यमान ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेत 'आर या पार' लढ्याचे रणशिंग फुंकले आहे. दरम्यान मलकापूर नगरपरिषदेने पंधरा वर्षांपूर्वी शाहूवाडी-चनवाड गावासह हद्दवाढीचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. याउलट शाहूवाडी-चनवाड ग्रामस्थांनी स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या आग्रहाने नगरपंचायत दर्जाची मागणी केली आहे.
शाहूवाडी-चनवाड येथील २०११ च्या जनगणनेनुसार १ हजार ७५७ लोकसंख्या तर कुटुंब संख्या ३६० कागदोपत्री नोंद दिसते. प्रत्यक्षात आजघडीला सुमारे ४ हजार ५०० लोकसंख्या तर हजाराच्या आसपास कुटुंब संख्या आहे. येथे तहसील, पंचायत समिती, दुय्यम निबंधक, पोलीस ठाणे, वन विभाग, सिटी सर्व्हे, कृषी विभाग आदी कार्यालयांबरोबरच प्रथमवर्ग न्यायालय असल्यामुळे दैनंदिन नागरिकांची आवक-जावक प्रचंड प्रमाणात होत असते. भरीतभर बाहेरून येऊन येथे वास्तव्य करणाऱ्यांची संख्या कमी नाही. मलकापूर शहर हद्दवाढीस नैसर्गिक मर्यादा असल्याने तुलनेत शाहूवाडी-चनवाड परिसराचा नागरी विस्तार झपाट्याने वाढत आहे.
अशावेळी मूलभूत नागरी सुविधा आणि सेवा पुरविण्यात शाहूवाडी-चनवाड ग्राम पंचायत निधी अभावी असमर्थ ठरत आहे. उपलब्ध तुटपुंज्या निधीतून स्वच्छता, पाणी, वीज यावरील खर्चाचा ताळमेळ घालताना कमालीची दमछाक होते. यामुळे सत्तेत कोणीही असले तरी कारभारी कार्यकर्त्यांना लोकांचा रोष पत्करावा लागतो. म्हणून नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त झाल्यास येथील नागरी सेवा सुविधांचे प्रश्न सुटणार आहेत. मात्र नगरपंचायत दर्जाचा चेंडू शासनाच्या कोर्टात टोलविणारी प्रशासकीय यंत्रणा येथे पुन्हा ग्राम पंचायत निवडणूक कार्यक्रम राबविण्याच्या विचारात आहे.
दरम्यान नगरपंचायत प्रश्नावर सावधपणे हालचाल करणाऱ्या ग्रामस्थांनी १८ ऑक्टोबर २०२१ रोजी बोलावलेल्या ग्रामसभेत आगामी सर्वच निवडणूक कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा ठराव मंजूर केला. यासाठी विद्यमान जिल्हाधिकारी रेखावार यांची सर्वपक्षीय कृती समितीने भेट घेऊन या ठरावाची प्रत सादर केली. दहाबारा जणांच्या शिष्टमंडळाने या विषयावर जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून नगरपंचायत दर्जाबाबत त्यांना साकडे घातले होते. या मागणीच्या पुष्ठ्यर्थ शाहूवाडी-चनवाड ग्रामस्थांनी प्रशासनाविरुद्ध 'असहकार' अस्त्र उपसले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर अल्पकाळ आले होते. यावेळी खासदार धैर्यशील माने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्र्यांना भेटून 'शाहूवाडी ग्रामस्थांनी केलेल्या नगरपंचायत मागणीबाबत सकारात्मकतेने विचार करावा, आणि येथील समस्या प्राधान्याने सोडवावी.' अशा आशयाचे पत्र दिले आहे.