Shaktipeth Highway | ‘शक्तिपीठ’विरोधात मंगळवारी शिरोली येथे महामार्ग रोखणार
कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाला केवळ कोल्हापुरातून नव्हे तर बारा जिल्ह्यांतून विरोध होत आहे. विरोध होत नसता तर धाराशिवमधून अधिकारी सर्वेक्षण सोडून पळून का गेले असते? शक्तिपीठ महार्गाच्या विरोधात दि. 1 जुलै रोजी शिरोली येथे महामार्ग रोखण्यात येणार असल्याची माहिती आमदार सतेज पाटील व राजू शेट्टी यांनी शुक्रवारी दिली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आंदोलनात येतील असे वाटत नाही. आले तर स्वागतच असे पाटील यांनी सांगितले.
शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात महामार्ग रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्या नियोजनासाठी शुक्रवारी शासकीय विश्रामधाम येथे प्रमुख पदाधिकार्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
शक्तिपीठ आंदोनलासंदर्भात शासनाने जर बळाचा वापर केला तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. खासदार संदीपान भुमरे यांच्या चालकाच्या नावावर 150 कोटींची जमीन असल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात विचारले असता शेट्टी म्हणाले, असा ड्रायव्हर मला पण मिळावा.

