Kolhapur news :
आजरा : आजरा तालुक्यातील सर्फनाला प्रकल्प जूनमध्येच ओव्हरफ्लो झाला आहे. तर आंबेओहळ, चित्री, उचंगी प्रकल्पही १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत. सर्फनाला सलग दोन वर्षे ओव्हरफ्लो झाला आहे.
हा प्रकल्प शुक्रवारी रात्री आठपर्यंत १०० टक्के भरला होता आणि रात्री नऊनंतर ओव्हरफ्लो होण्यास सुरुवात झाली. गतवर्षीपासून सर्फनाला प्रकल्पात पाणीसाठा करण्यात येत आहे. गतवर्षी पहिल्याच वर्षी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला होता. यावर्षीही जूनमध्येच ओव्हरफ्लो झाल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सर्फनाला धरण परिसरात २५० मिमीपेक्षा अधिक पाऊस रोज पडत आहे, तर आतापर्यंत १९६२ मिमी पाऊस कोसळला आहे. गेल्या पंधरा दिवसांत ढगफुटीसदृश पावसामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. हिरण्यकेशी नदीची पातळी दुतर्फा वाढणार असल्याने नागरिकांना नदीकाठावर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.