

कोनवडे : राम देसाई
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाच्या मॅपिंग आणि मोजणीच्या कामावरून गेल्या काही दिवसांपासून वातावरण चांगलेच तापले आहे. या महामार्गाला विरोध करत तालुक्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, प्रशासनाच्या मॅपिंगच्या कामाला अनेक गावांमध्ये तीव्र विरोध करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असतानाही प्रशासनाकडून सध्या रात्रीच्या अंधारात ड्रोनद्वारे मोजणीच्या हालचाली म्हसवे, दारवाड, निळपण, कोनवडे, नाधवडे परिसरात गेली दोन रात्र सुरू असल्याचे शेतकऱ्यांच्या निर्देशनास येत आहे.
शक्तीपीठ मॅपिंगसाठी आलेल्या प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना काही ठिकाणी गावातून परत पाठवण्यात आले. यावेळी परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. मोजणीसाठी वापरण्यात येणाऱ्या मशीनची जाळपोळ, वाहनांची तोडफोड तसेच कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या.
या घटनांमुळे भुदरगड तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न अधिकच संवेदनशील बनला आहे. मात्र, आता या मॅपिंगच्या कामाबाबत एक नवा प्रकार समोर येत आहे. शेतकऱ्यांकडून दिवसा मॅपिंगला विरोध होत असताना आता प्रशासनाकडून रात्रीच्या वेळी ड्रोनच्या माध्यमातून शेतशिवाराचे सर्वेक्षण केले जात असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
भुदरगड तालुक्यातील म्हसवे, दारवड, निळपण, कोनवडे आणि नाधवडे या गावांच्या परिसरात रात्री साधारण बारा वाजण्याच्या सुमारास शक्तीपीठ बाधित शेतजमिनींच्या वरून ड्रोन फिरताना दिसत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. रात्रीच्या शांततेत अचानक आकाशात ड्रोन फिरताना दिसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी ड्रोनद्वारे सर्वेक्षण होत असल्याच्या चर्चेमुळे शेतकऱ्यांचा रोष आणखी वाढला आहे. प्रशासनाकडून नेमके कोणत्या उद्देशाने ड्रोन उडवले जात आहेत? या सर्वेक्षणासाठी कोणती परवानगी घेण्यात आली आहे? कोणत्या विभागाच्या आदेशानुसार हे काम सुरू आहे? तसेच या मॅपिंगमधून कोणती माहिती संकलित केली जात आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या ड्रोन हालचालींबाबत जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागाने तातडीने खुलासा करावा, अशी मागणी होत आहे.
शक्तीपीठ महामार्गाच्या मॅपिंगवरून भुदरगड तालुक्यात आधीच तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असताना रात्रीच्या ड्रोन सर्वेक्षणाच्या प्रकारामुळे हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासन या आरोपांबाबत काय भूमिका घेते आणि शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन कसे करते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
दोन दिवसापुर्वी शेतकऱ्यांनी विरोध करत मॅपिंगचे काम बंद पाडले असताना, प्रशासन रात्रीचा ड्रोनद्वारे सर्व्हे करत आहे. भुदरगड तालुका हा क्रांतीकारचा तालुका म्हणून ओळख आहे. शक्तीपीठ बाबत सरकारची हिटलरशाही हाणून पाडल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही.
- सर्जेराव देसाई, सरपंच म्हसवे
दिवसा विरोध, मग रात्रीच्या अंधारात मॅपिंग कशासाठी?
शक्तीपीठ महामार्गामुळे आपल्या सुपीक जमिनी, शेती आणि उदरनिर्वाहावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. यापूर्वी अनेक गावांतील शेतकऱ्यांनी एकत्र येत मॅपिंगच्या कामाला विरोध दर्शवला होता. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या भावना आणि आक्षेपांचा विचार करावा, अशी मागणीही करण्यात आली होती.