

Chokak to Ankali highway farmer compensation
जयसिंगपूर : मागील 4 वर्षापासून सांगली-कोल्हापूर महामार्गातील चोकाक ते उदगाव-अंकली पर्यंतच्या 33 कि.मी.चा मार्ग भरपाईप्रश्नी वादाच्या भवर्यात अडकला होता. यासाठी 11 गावातील शेतकरी मिळून चौपट भरपाईसाठी राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समिती व भारतीय किसान संघ यांच्यावतीने आंदोलन सुरू होती.
हा रखडलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडून पाठपुरावा सुरू होता. अखेर 937 शेतकर्यांना 171 कोटी रुपयेची भरपाई मिळणार असून चौपटमुळे तब्बल 76 कोटी रुपये शेतकर्यांना वाढीव मिळणार आहे. विशेषत: सांगली-कोल्हापूर व रत्नागिरी-नागपूर महामार्गाचा विषय मार्गी लागला असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, चोकाक ते उदगाव-अंकली वगळता रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. तसेच या मार्गातील सर्व बाधित शेतकरी व मिळकतधारकांना चौपट भरपाई मिळाली आहे. मात्र, मिरज तालुक्यातील अंकली, शिरोळ तालुक्यातील उदगाव, उमळवाड, जैनापूर, निमशिरगाव, तमदलगे तर हातकणंगले तालुक्यातील मजले, हातकणंगले, माणगांववाडी, अतिग्रे व चोकाक या गावातील बाधितांना दुप्पट भरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या विरोधात शेतकर्यांनी मोजणीला विरोध करून आंदोलन सुरू ठेवले होते.
त्यानंतर मंत्रालयात बैठक घेण्यात आली होती. यावेळी महसूलमंत्र्यांनी जिल्हाधिकार्यांना चौपट भरपाईबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश दिले होते. याचा पाठपुरावा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडून सुरू होता. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना महामार्गाचा अडकलेला प्रश्न व शेतकर्यांचे होणारे नुकसान याची माहिती आमदार यड्रावकर यांनी दिली होती. अखेर बुधवारी शासनाने चौपट भरपाईचा प्रस्ताव मंजुर केल्याने शेतकर्यांना 171 कोटी रुपये शेतकर्यांना मिळणार असून यातील 76 कोटी रुपयाचा निधी राज्यशासनाने दिली असल्याची माहिती आमदार यड्रावकर यांनी दिली. त्यामुळे अखेर महामार्गाचा विषय मार्गी लागणार आहे.
2012 साली मंजुर झालेला सांगली-कोल्हापूर महामार्ग वादाच्या भोवर्यात अडकला होता. त्यानंतर रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाला होता. त्यानंतर सांगली-कोल्हापूर मार्ग राष्ट्रीय महामार्गात विलीन केला आता. आता 11 गावातील शेतकर्यांचा चौपट भरपाईचा विषय मार्गी लागल्याने चोकाक-अंकली पर्यंतचा मार्ग गतीने पूर्ण होणार आहे. त्यामुळे अपघाताची संख्या कमी होणार असून महामार्गावर वाहतूक कोंडी टळणार आहे.
- राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार