जयसिंगपूर : सांगली-कोल्हापूर महामार्गावर होणारे अपघात, यात जाणारे बळी याचे सोयरसुतक कुणालाच नाही. १० वर्षांपासून बायपास महामार्गावर ओढ्यावरील पुलाचे काम अपूर्ण असून सध्या रुंदीकरणाचे काम सुरू होते. याबाबत दै. 'पुढारी'ने दि. २८ सप्टेंबर रोजी 'गरज पूल दुरुस्तीची, काम रस्ता रुंदीकरणाचे' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर प्रशासनाचे डोळे उघडले असून, थेट पुलाची दुरुस्ती व सन २०१२ मध्ये मार्गाचे काम सुरू केले आहे. सांगली-कोल्हापूर महामार्गाच्या चौपदरीकरणाला मंजुरी मिळाली. सांगली ते अंकली आणि तमदलगे ते शिरोलीपर्यंतचे चौपदरीकरण, तर उदगाव ते तमदलगे मुख्य महामार्ग व बायपास महामार्ग असा दुपदरी महामार्ग धरण्यात आला. याचे काम रखडले असून, सध्या हा महामार्ग रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गात विलीन झाला आहे. जयसिंगपूर- उदगावमार्गे सातत्याने वाहतूक कोंडी ल महापूर व ओक्यावर पाणी आल्याने २५ दिवस मार्ग बंद होत आहे. त्यामुळे नागरिक व प्रवासी त्रस्त झाले आहेत. उदगाव येथे ओड्यावरील पुलाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. यावर सुमारे २० फुटांचा स्लॅब व दोन्ही बाजूंना भराव झाल्यास महामार्गावर कुठेच वाहतूक कोंडी होणार नाही.
त्यामुळे या पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याऐवजी बायपासचे सुमारे १२ कोटी रुपयाच्या खर्चातून दोन्ही बाजूंना दीड-दीड मीटरने रुंदीकरण करण्यात येत होते. दै. 'पुढारी'च्या वृत्तानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली असून, आता रुंदीकरण ४ कि. मी. ऐवजी फक्त ३ कि.मी. करण्यात येणार आहे आणि उर्वरित निधी या पुलाची दुरुस्ती आणि थेट मार्गासाठी वापरण्यात येणार आहे. याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे.
गेल्या आठ वर्षांपूर्वी उदगाव येथे टोलनाक्यापासून थेट बायपासला समांतर नवा मार्ग तयार करून ओढ्यावर मोठा भक्कम पूल उभारला. फक्त यावर २० फुटांचा स्लॅब आणि दोन्ही बाजूंना भराव टाकल्यास महापुरात वाहतूकच बंद होणार नाही, असे वास्तव आहे; मात्र प्रशासनाने हे काम करण्याऐवजी रुंदीकरणाचे काम हाती घेतले होते. याबाबतचे दै. 'पुढारी'ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर बांधकाम विभागाच्या प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करून तातडीने याच्या कामाला सुरुवात केली. त्यामुळे कायमस्वरूपी वाहतुकीवर उपाययोजना होणार असल्याने दै. 'पुढारी'मुळेच महामार्गाचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघाला असल्याची भावना येथील ग्रामस्थ नीळकंठ राजमाने, अविनाश चौगुले, शीतल चौगुले आदींनी व्यक्त केली.