

कुरुंदवाड : जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसाय बंद करण्याचे कडक आदेश दिलेले असतानाही, त्याला न जुमानता ऐन दिवाळीच्या धामधुमीत शिरोळ तालुक्यातील आलास गावात तीन पत्त्यांचा जुगार अड्डा राजरोसपणे सुरू असल्याचे उघड झाले आहे. या अवैध धंद्यावर कुरुंदवाड पोलिसांनी छापा टाकून १२ जुगारींना रंगेहाथ पकडले असून, त्यांच्याकडून २ लाख २७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आलास येथील अवैध व्यवसायिकांमध्ये पोलीस प्रमुखांचे कोणतेच भय राहिले नसल्याची संतापजनक चर्चा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
कुरुंदवाड पोलिसांना आलास येथील मेहबुब मुजावर यांच्या शेतातील जनावरांच्या गोठ्यामागे बेकायदेशीर जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर खाडे आणि ज्ञानदेव सानप यांचे विशेष पथक तयार केले.
या पथकाने सायंकाळच्या सुमारास जुगार अड्ड्यावर अचानक धाड टाकली.या कारवाईत पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या स्वप्निल रवींद्र शहापुरे (वय. ३२), शिवानंद प्रभू मठपती (वय. ३५), सहदेव लहु कांबळे (वय. ५२), किरण लहु कांबळे (वय. ४८), उमेश चंद्रकांत कोल्हापुरे (वय. ३८), सुनिल संभाजी कांबळे (वय. ३१), हैदर गुलाब दमामे (वय. ३४), मेहबुब फरीद मुजावर (वय. ५९, अड्डा चालक), उमेश मनोहर राजमाने (वय. ३४), खलील गवंडी, सम्मत कडेगावकर आणि सुनील रविराज शिंगाडे. या बारा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून जुगारासाठी वापरले जाणारे ७,८०० रुपये रोख रक्कम आणि चार मोटारसायकली (हिरो स्प्लेंडर - क्र. एम.एच-५१-३९५३, बजाज डिस्कव्हर - क्र.एम.एच -०९ बी.व्ही ३६७८, बजाज डिस्कव्हर - क्र.एम.एच-०९ बी.वाय १३२०, हिरो स्प्लेंडर - क्र.एम.एच-०९ बी.के ०७१४) असा एकूण २ लाख २७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असले तरी, जिल्हा पोलीस प्रमुखांच्या स्पष्ट आदेशानंतरही आलाससारख्या गावात जुगार राजरोसपणे सुरू असल्याने, अवैध व्यवसायिकांविरोधात आणखी कठोर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. कुरुंदवाड पोलीस अधिक तपास करत आहेत.