

Kolhapur Crime Nishant Wadekar Arrested
कुरुंदवाड : एकमेकांकडे बघितल्याच्या कारणावरून रविवारी (दि.६) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सिद्धार्थ चौकात अक्षय दीपक चव्हाण (वय 23, रा. कुरुंदवाड) या युवकाचा धारदार शस्त्रांनी सपासप वार करत निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणातील चौथा आरोपी निशांत नरेश वाडेकर (रा. नृसिंहवाडी) याला ताब्यात घेतले आहे. एकूण चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या खुनामागे यश काळे (वय 19, रा. कुरुंदवाड), अमन जमीर दानवाडे (वय 22, रा. इचलकरंजी), श्रीजय बडसकर (वय 22, रा. औरवाड) आणि निशांत नरेश वाडेकर (रा. नृसिंहवाडी) अशी चौघांची नावे तपासात निष्पन्न झाली आहेत. प्राथमिक चौकशीत या चौघांनी जुन्या वादाचा राग मनात धरून हा जीवघेणा हल्ला केल्याची कबुली दिली आहे.
ही घटना घडण्याआधी, 5 जुलैरोजी अक्षय आणि यश यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर पुढे संघर्षात झाले. 6 जुलैच्या रात्री सिद्धार्थ चौकात या चौघांनी मिळून अक्षयवर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात अक्षयचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर शहरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी त्वरीत कारवाई करत आरोपींचा तपास लावला आहे. चौघा आरोपींवर हत्या व अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रविराज फडणीस करत आहेत.