

मुदाळतिट्टा : देवगड-निपाणी राज्यमार्गावरील श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील उड्डाणपुलावर उसाच्या कांड्या भरून जाणार्या ट्रॉलीचा जॉईंट तुटल्याने ट्रॉली दहा फूट मागे जाऊन मुदाळतिट्ट्याकडे भाजीपाला भरून जाणार्या टेम्पोवर आदळली. टेम्पोमध्ये असणारे व्यापारी किरकोळ जखमी झाले.
टेम्पोपासून थोडीशी मागे ट्रॉली गेली असती, तर कठड्यावरून खाली असणार्या सर्व्हिस रोडवर कोसळली असती. आणि मोठा अपघात झाला असता. प्रत्येक रविवारी बाळूमामाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी असते. भाविकांची वाहने उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला उभी केली जातात.
त्यामुळे निपाणी राधानगरी मार्गाकडे जाणार्या वाहनधारकांना जीव मुठीत धरून मार्गस्थ व्हावे लागते. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. प्रसंगी दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडवरून वाहतूक सुरू झाली.
अवजड वाहने सर्व्हिस रोडवरून जाऊ लागल्याने त्याचा प्रचंड त्रास वाहतुकीच्या कोंडीवर झाला. वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या. वाहतुकीची कोंडी झाल्याने प्रवासी व भक्तांना नाहक त्रास सहन करावा लागला. ट्रॉली जेसीबीच्या साहाय्याने बाजूला केल्यानंतर एक तासाने पुलावरून प्रत्यक्ष वाहतूक सुरू झाली.