

राजेंद्र जोशी
कोल्हापूर : सार्वजनिक वापराच्या जागांचे मूल्य आणि त्यांची उपयोगिता यांच्याविषयी प्रशासन आणि शासनकर्ते यांच्यामध्ये गांभीर्याचा अभाव असला की समाजाचे कधीही न भरून येणारे नुकसान होते. सार्वजनिक सुविधांची आबाळ होते. पिढ्यांचे नुकसान होते आणि अशा मोक्याच्या भूखंडात श्रीखंड शोधणार्या लँडमाफियांचे उखळ पांढरे होते.
कोल्हापूर महापालिका सध्या या विदारक अनुभवातून जाते आहे. महानगरपालिकेच्या मालकीच्या सार्वजनिक वापराच्या जागांची कारभारी, प्रशासन आणि माफियांनी विल्हेवाट लावलीच आहे. परंतु, सुवर्णमहोत्सव उलटून गेलेल्या महापालिकेला स्वत:च्या इमारतीसाठी आरक्षित असलेला भूखंडही राखता येत नाही, असे दुर्दैवी चित्र उभे राहिले आहे. प्रशासनाने नुकतेच निर्माण चौकातील स्वत:च्या सुमारे 40 कोटी रुपये मूल्य असलेल्या भूखंडावरील मनपाची मुख्य इमारत बांधण्याचा प्रस्ताव बासनात गुंडाळून शेंडापार्कात शासनाच्या 5 एकर जागेवर इमारत बांधण्याचा मनोदय व्यक्त केला. परंतु, शेंडापार्कातील जागेविषयी असलेला न्यायालयीन वाद लक्षात घेता महानगरपालिकेची प्रस्तावित मुख्य इमारत हे स्वप्नरंजन ठरण्याचीच शक्यता अधिक आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेची स्थापना 1972 मध्ये झाली. मात्र 66.82 चौरस किलोमीटर क्षेत्र असलेल्या मनपाला स्वत:ची भव्य वास्तू गेली 50 वर्षे उभारता येत नाही हे वास्तव आहे. एखाद्या विंचवाने आपले बिर्हाड हालवावे अशारितीने महानगरपालिकेने आपल्या मुख्य इमारतीच्या जागेसाठी आजपर्यंत दोन ठिकाणी भूमिपूजन केले. नागाळा पार्कात खानविलकर बंगल्यासमोर असलेल्या शासकीय जागेत प्रथम ही इमारत प्रस्तावित केली होती. त्यानंतर ताराबाई पार्कात सासने विद्यालयाच्या ग्राऊंडसमोरील महानगरपालिकेच्या शहरी जमीन कमाल धारणेत अतिरिक्त ठरलेल्या जागेमध्ये महापालिकेने 23 वर्षांपूर्वी भूमिपूजन केले होते. कालांतराने महानगरपालिकेच्या निष्क्रियतेने ही जागा मूळ जमिन मालकाच्या ताब्यात गेली, तेथे व्यापारी संकुल उभारले गेले.
यानंतर निर्माण चौकात महापालिकेच्या मैलखड्डा म्हणून ओळखल्या जाणार्या रि.स.नं. 714, 786 (सिटी सर्व्हे नं. 255, 256) या क्षेत्रापैकी 9 एकर 36 गुंठे जागेमध्ये महापालिकेने नवी इमारत प्रस्तावित केली. त्यासाठी वास्तूविशारदांची स्पर्धा जाहीर झाली. आराखडे तयार झाले. परंतु, या जागेवर तब्बल 10 वर्षे काही झाले नाही. परिणामी अतिक्रमण करणार्या माफियांनी महापालिकेच्या जागेमध्ये ठाण मांडण्यास सुरुवात केली. जागेची पूर्वापार मालकी सांगणारा मालक जागा झाला. त्याने कोर्टकचेर्या सुरू केल्या आणि केवळ शासनकर्त्यांच्या निष्क्रियतेमुळे हा मोक्याचा भूखंड सोडून महानगरपालिकेला स्वत:च्या इमारतीसाठी नव्या जागेत इमारत बांधण्याची नव्याने सुरुवात करावी लागते आहे.
(पूर्वार्ध)
लबाडांचे मनसुबे हाणून पाडण्याची गरज
मनपा प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी दोन दिवसांपूर्वी शेंडापार्कातील शासनाच्या 5 एकर भूखंडावर महानगरपालिकेची इमारत बांधण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे शहरवासीयांचे काहीकाळ स्वप्नरंजनही होईल. परंतु, महापालिकेच्या मूळ जागेचे स्थलांतर अन्य भूखंडावर करण्याच्या कृतीमागे संगनमताचा धूर दिसतो आहे. संबंधित जागेवर काही धनिकांचा, विकसकांचा डोळा आहे. यातील जागेचे काही व्यवहार प्रगतिपथावर असल्याचेही समजते. मग महापालिकेच्या नव्या जागेचे स्थलांतर हे कुणाच्या सोईसाठी आहे? असा प्रश्न उपस्थित होतो. यावर कोल्हापूरकरांनी वेळीच आवाज उठवून लबाडांचे मनसुबे हाणून पाडले पाहिजेत.