

A student from Kuplewadi ended her life after getting low marks in the exam
राशिवडे : पुढारी वृत्तसेवा
राधानगरी तालुक्यातील कुपलेवाडी येथील कु.साधना पांडुरंग टिंगरे (वय१८) हिने विज्ञान शाखेमध्ये ४८ टक्के गुण मिळाल्याने नैराश्यातून गळफास लावुन जीवन संपवले. या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, राधानगरी तालुक्यातील कुपलेवाडी येथील कु.साधना टिंगरे हिला विज्ञान शाखेमध्ये ४८ टक्के इतके गुण मिळाले. कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यातुन गुरुवार दि.८ मे रोजी घरामध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास लाऊन साधना टिंगरेने जीवन संपवण्याचा प्रकार दु.१२.३० वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आला.
विज्ञान शाखेत केवळ ४८ टक्के गुण मिळाल्याने नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल शेळके करीत आहेत. साधना टिंगरे हिने हे टोकाचे पाउल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर तीच्या घरांच्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये गुंणांवरून चुरस असते. कमी गुण मिळाल्यास मन दु:खी होणे हे सामान्य आहे. मात्र कमी गुण मिळाल्यावर जीवनाचा शेवट करणे योग्य नाही. पालकांनीही मुलांना चांगले गुण मिळविण्यासाठी प्रोत्साहित जरूर केले पाहिजे, मात्र कमी गुण मिळाले तर पुन्हा नव्या उमेदीने अभ्यास करून गुण प्राप्त करता येतात हे पटवून देणे गरजेचे बनले आहे.