

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
शहरातील गुजरीत दागिने विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी कळंब्यातील घरफोडी उघडकीस आणली. प्रसाद रघुनाथ माने (वय २०, रा. सुर्वेनगर, कळंबा) असे चोरट्याचे नाव आहे.
दागिने विक्रीसाठी आला अन् तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्याकडून १५ तोळे ८ ग्रॅम वजनाचे ८ लाख ४५ हजारांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. 'एलसीबी'चे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी ही कारवाई केली.
कळंबा रोडवरील आदिनाथनगर येथील डॉ. दीपाली सुभाष ताईंगडे यांच्या घरात फेब्रुवारी ते एप्रिल २०२४ या कालावधीत घरफोडी झाली होती. करवीर पोलिस ठाण्यात त्यासंदर्भात गुन्हा दाखल झाला होता.
पोलिस निरीक्षक कळमकर यांच्या पथकाने तपास सुरू केला होता. सहायक पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलिस अंमलदार वैभव पाटील, गजानन गुरव, प्रवीण पाटील, संतोष बरगे, प्रदीप पाटील, विशाल खराडे, महेंद्र कोरवी आदींनी गुन्हा घडलेल्या ठिकाणी भेट दिली. गुन्ह्याची पद्धत व फिर्यादी यांच्या घरात काम करणारे कामगार यांची माहिती मिळविली. त्यानुसार तपास सुरू ठेवला.
पोलिस अंमलदार गुरव यांना प्रसाद माने याने चोरी केली असून, तो गुजरीत दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक कळमकर व त्यांच्या पथकाने सापळा रचला. माने याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याचे दागिने जप्त केले.