.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई/ नागपूर : पुढारी वृत्तसेवा
संकेत बावनकुळे आणि त्यांच्या मित्रांनी ऑडी कारच्या अपघातापूर्वी ज्या हॉटेलमध्ये मद्य प्राशन केले, तेथील बिलात बिफ कटलेटचा समावेश आहे. हिंदूत्व शिकविणाऱ्यांना गणेशोत्सव काळात गोमांस चालते काय, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेतच्या ऑडी कारचे अपघात प्रकरण आता चांगले तापू लागले आहे. खासदार राऊत म्हणाले, सर्वसामान्य नागरिकाने असा अपघात केला असता तर पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांसह मित्रांना पकडून धिंड काढली असती. संकेतच्या ऑडीकारमध्ये लाहोरी बारचे बिल मिळाले. त्यांच्या खाण्या- पिण्याच्या पदार्थांचे बिल समोर आणले पाहिजे. त्यात दारुचे बिल आहे. चिकन, मटण यांच्यासोबत बीफ कटलेटचाही समावेश आहे. पोलिसांनी बिल जप्त केले आहे. तुम्ही बिफ खायचे आणि लोकांचे बळी घ्यायचे, असा आरोप करत राऊत यांनी देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, असा इशारा दिला.
ऑडी कारने इतर वाहनांना धडक दिली त्यावेळी स्वतः कारचा मालक संकेत बावनकुळे ड्रायव्हरच्या शेजारी बसला होता, असे पोलीस सांगत आहेत. कारचालक अर्जुन हावरे व रोहित चिंतमवार यांची वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो. पण संकेत बावनकुळेंची वैद्यकीय तपासणी का केली गेली नाही? त्याच्यावर कोणतीच कारवाई का केली गेली नाही? नंबर प्लेट का काढून ठेवण्यात आली, अशा प्रश्नांची सरबत्ती करत संकेतला निबंध लिहायला लावून सोडणार काय, अशी टीका करत बुधवारी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पोलिसांना धारेवर धरले.
पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी मात्र सांगितले की, कारचालकाला जामीन देण्यात आला असला तरी आमच्यावर कुठलाही राजकीय दबाव नाही. सीसीटीव्हीची तपासणी झालेली असताना जे- जे काही पुरावे पुढे आले आहेत त्यानुसार कारवाई सुरू आहे. कुणालाही अभय देण्याचा प्रश्न नाही. कार अर्जुनच चालवित होता. संकेत बावनकुळे ड्रायव्हरच्या शेजारी बसून होता.