

पुढारी ऑनलाईन डेस्क
जागतिक सकारात्मक संकेतांदरम्यान भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी (दि.१२) तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने ४०० अंकांनी वाढून ८१,९३० ला स्पर्श केला. तर निफ्टी २५ हजारांवर खुला झाला. दरम्यान, सकाळी ९.४५ वाजता सेन्सेक्स ३५० अंकांच्या वाढीसह ८१,८७० होता. तर निफ्टी १२५ अंकांनी वाढून २५,०४३ वर व्यवहार करत होता. NBFC शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून येत आहे. झोमॅटो शेअर्स (Zomato shares) सुमारे २ टक्क्यांनी वाढून २८० रुपयांवर पोहोचला आहे.
सेन्सेक्स- निफ्टी तेजीत खुले.
बँकिग, आयटी आणि मेटल शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी.
बीएसई मिडकॅप, स्मॉलकॅप जवळपास १ टक्के वाढले.
सर्व १३ क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात.
जागतिक बाजारातील तेजीचा मागोवा घेत भारतीय बाजारातही खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. विशेषतः बँकिंग, आयटी आणि मेटल शेअर्समध्ये जोरदार खरेदी होत आहे. यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत व्यवहार करत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक जवळपास १ टक्के वाढले. सर्व १३ क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात खुले झालेत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीचे संकेत आणि भारतीय बाजारात परदेशी गुंतवणूक वाढणार असल्याचे अपेक्षेने बाजारात सध्या तेजीचा माहौल राहिला आहे.
निफ्टीवर टाटा स्टील, श्रीराम फायनान्स, अदानी पोर्ट्स, हिंदाल्को, सिप्ला हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी वाढले आहेत. तर टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, नेस्ले इंडिया या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. बाजारातील तेजीत पीएसयू बँक आणि मेटल शेअर्स आघाडीवर आहेत.
सेन्सेक्सवर अदानी पोर्ट्स, टाटा स्टील, टेक महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, भारती एअरटेल, कोटक बँक, एसबीआय हे शेअर्स १ टक्क्याने वाढले आहेत. तर टाटा मोटर्स, मारुती, नेस्ले इंडिया शेअर्समध्ये घसरण झाली आहे.