kdcc bank : दोन्ही काँग्रेस बॅकफूटवर; शिवसेनेला उभारी | पुढारी

kdcc bank : दोन्ही काँग्रेस बॅकफूटवर; शिवसेनेला उभारी

कोल्हापूर ; संतोष पाटील : जिल्हा बँकेत भाजपच्या साथीने काँग्रेस आणि राष्टीवादीने बाजी मारली. मात्र, विरोधकांना पॅनेल करण्यास फक्त दीड तासांचा अवधी मिळाला आणि अवघ्या आठ दिवसांच्या धुवाँधार प्रचारात शिवसेनेने सत्ताधार्‍यांना घाम फोडला. निवडणूक बिनविरोध नाही झाली तरी एकतर्फी होणार असल्याचे आराखडे बांधणार्‍या दोन्ही काँग्रेसला शिवसेनेने साथ सोडताच बॅकफूटवर जावे लागले. (kdcc bank)

बँकेच्या निवडणुकीचा कौल विरोधात गेला असला तरी शिवसेनेला मिळालेली उभारी विधानसभेची पायाभरणी ठरणार आहे. मागील दोन वर्षांत जिल्ह्याच्या राजकारणात तोळामासा झालेल्या भाजपला यानिमित्ताने गुलाल उधळण्याची संधी मिळाली. जिल्हा परिषद आणि महापालिकेत पुन्हा फेरमांडणी होणार असल्याने राजकारणाला दिशा देणारी बँकेची निवडणूक ठरली.

kdcc bank : मतदारांचा शिवसेनेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब

जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध झाली नाही तरी एकतर्फी होईल असा अंदाज दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांचा होता. मात्र, हे मनसुबे शिवसेनेने धुळीस मिळवले. बिनविरोध होणार्‍या बँकेच्या निवडणुकीत 98 टक्के मतदारांनी मतदान केले. पणन प्रक्रिया गटातून खा संजय मंडलिक यांच्या साथीला बाबासाहेब पाटील- असुर्लेकर आणि बँक प्रतिनिधी गटात प्रा. अर्जुन आबिटकर अशा जागांसाठी शिवसेना आग्रही होती. शिवसेनेने प्रामुख्याने या जागांसाठीच पॅनेल केले. त्या तिन्ही जागा निवडून देत, मतदारांनी शिवसेनेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

आ. विनय कोरे यांना शाहूवाडी शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील यांनी धक्का दिला. पद्धतशीर केलेल्या जोडण्यामुळे कोरे समर्थक विद्यमान संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर पराभूत झाले. मानसिंग गायकवाड यांचे चिरंजीव रणवीर गायकवाड यांच्या विजयाने गायकवाड गटाचे राजकारणात कमबॅक झाले. पतसंस्था बँका गटातून भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवडे यांचा करेक्ट कार्यक्रम झाला. हातकणंगले वगळता उर्वरित जिल्ह्यात आवाडे यांचा मतदारांनी अंदाज फोल ठरवला.

प्रकाश आबिटकर यांची राष्ट्रवादीविरोधात आक्रमक भुमिका

शिवसेनेचे आ. प्रकाश आबिटकर यांचे बंधू प्रा. अर्जुन आबिटकर यांनी आवाडे यांना पराभूत केले. एकाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळेच विरोधी पॅनेल झाल्याची टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती. येत्या काळात राष्ट्रवादीसोबत प्रकाश आबिटकर यांची तीव्र आक्रमक भूमिका राहील.

कृषी पणन संस्था गटात विरोधकांनी बाजी मारली. आ. विनय कोरे यांनी बाबासाहेब पाटील-असुर्लेकर यांना टोकाचा विरोध करत पॅनेलमधून पत्ता कट केला होता. मात्र, तब्बल दोनशे मतांच्या फरकांनी विजयी होत खा. संजय मंडलिक आणि असुर्लेकर यांनी बँकेत दमदार प्रवेश केला. असुर्लेकरांचा विजय आ. विनय कोरे यांना जिव्हारी लागणारा आहे.

अवघ्या आठ दिवसांच्या प्रचारात विरोधी आघाडीच्या क्रांतिसिंह संपतराव पवार-पाटील यांनी इतर शेती संस्था गटात जोरदार धडक दिली. प्रचारासाठी कमी वेळ मिळाल्याने विरोधी आघाडी राखीव गटात कमी पडली. सरासरी दोन हजारांच्या फरकांनी राखीव गटातील महिला, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती आणि विशेष मागास वर्गीय गटात सत्ताधारी आघाडीच्या विजय मिळवला, हाच काय तो सत्ताधार्‍यांसाठी दिलासा ठरला.

नवा राजकीय डाव कसा असेल?

येऊ घातलेली महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसह जिल्ह्याच्या राजकारणात भविष्यात ही बँकेची समीकरणे असणार नाहीत. भाजप आघाडीचा स्वतंत्र बाणा कायम राहील. शिवसेनाही अस्तित्वासाठी लढत राहील. पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कलाने संजय मंडलिक राजकारण करत असल्याचा आरोप होता. तो मुद्दा खोडून काढत खा. संजय मंडलिक यांच्या नेतृत्वावर या निवडणुकीमुळे शिक्कामोर्तब झाले.

विरोध जिल्ह्यातील राजकारणात काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला सोबत न घेता राजकारण केल्यास तोटाच होणार असल्याचे संकेत जिल्हा बँकेच्या निकालावरून स्पष्ट झाले आहेत. आ. विनय कोरे याचे विरोधक निवडून आले आणि समर्थक पराभूत झाले. आ. प्रकाश आवाडे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. हे शल्य भाजप आघाडी कधीही विसरणार नाही.

Back to top button