कोल्हापूर जिल्हा बँक : प्रकाश आवाडे पराभूत, प्रकाश आबिटकर यांचे बंधू अर्जुन आबिटकर विजयी | पुढारी

कोल्हापूर जिल्हा बँक : प्रकाश आवाडे पराभूत, प्रकाश आबिटकर यांचे बंधू अर्जुन आबिटकर विजयी

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीत आमदार प्रकाश आवाडे पराभूत झाले. भुदरगड-राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांचे बंधू अर्जुन आबिटकर विजयी झाले आहेत.

कोल्हापूर जिल्हा बँकेवर सत्ताधारी गटाने वर्चस्व राखले आहे. याआधी ६ जागा बिनविरोध आणि आता मतदानानंतर त्यांच्या ६ जागा निवडून आल्या आहेत.

राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीकडून बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर व खा. संजय मंडलिक रिंगणात होते. आसुर्लेकर यांना आ. विनय कोरे यांनी थेट विरोध होता. त्यामुळे ईर्ष्या अधिक टोकाला गेली. आसुर्लेकर यांना परिवर्तन पॅनेलमधून उमेदवारी देत सत्ताधार्‍यांना आव्हान दिले. आसुर्लेकर व मंडलिक यांनी या गटातून बाजी मारली आहे.

जिल्ह्यातील १३ ठिकाणी ४० केंद्रांवर ७ हजार ६५१ पैकी तब्बल ७ हजार ४९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. शाहूवाडी, गडहिंग्लज आणि भुदरगड तालुका संस्था गटात १०० टक्के मतदान झाले. प्रक्रिया गटात ४४८ पैकी ४४६, पतसंस्था गटात १२२१ पैकी १२०७, इतर संस्था गटात ४११५ पैकी ३९९५ असे सरासरी ९८ टक्के चुरशीने मतदान झाले.

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणूक मतमोजणीला आज शुक्रवारी (दि.७) सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. मतपेट्या उघडताच त्यात मतदारांनी लिहिलेल्या चिठ्ठ्या सापडल्या. या चिठ्ठ्यांमध्ये काही मतदारांनी नेते, उमेदवारांना उद्देशून सूचना केल्या आहेत. ‘आम्हाला वाटायचं साहेबांचे कार्यकर्ते भाजप वाढवत आहेत. पण साहेब सुद्धा…आता काय?. सर्व उमेदवार राजकारणी असून आज एकमेकांवर पकड करत आहेत. पण निवडणूक झाल्यानंतर पुन्हा गळ्यात गळे घालणारे स्वार्थी लोक बँकेवर कायम राहणार. त्यासाठी प्रशासक असणे आवश्यक आहे,’ असे मतदारांनी लिहिले आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : या राजकीय घडामोडींनी गाजले 2021 साल | Rewind 2021

Back to top button