sanjay telnade :  रक्तरंजित वर्चस्ववादातून तेलनाडेचा उदय

sanjay telnade :  रक्तरंजित वर्चस्ववादातून तेलनाडेचा उदय
Published on
Updated on

इचलकरंजी ; पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजी शहराची वस्त्रनगरी म्हणून व औद्योगिक शांतता असणारे शहर म्हणून ओळख निर्माण झाली होती. मात्र शहरात अवैध व्यवसायाच्या माध्यमातून झटपट मिळणार्‍या पैशामधून श्रीमंत होण्याचे स्वप्न अनेकांना खुणावू लागले. त्यातून वर्चस्ववादाचा रक्तरंजित संघर्ष सुरू झाला. यातून मटकाकिंग सलीम हिप्परगी याचा मुडदा पडला. या खुनात संजय तेलनाडे याचे नाव पुढे आले. (sanjay telnade)

त्यानंतर तेलनाडे याने दहशतीच्या माध्यमातूनच अवैध व्यवसायात दबदबा निर्माण केला. पोलिसातील काही यंत्रणाही त्याच्या वाढत्या गुन्हेगारीला पोषक ठरली. इचलकरंजी शहरात पूर्वी काही गुन्हेगारी घटना घडत होत्या.

sanjay telnade : सलीम हिप्परगी हे मटक्याच्या व्यवसायातील मोठे प्रस्थ

मात्र टोळीयुद्ध, अवैध व्यवसायातून एकमेकांचे मुडदे पाडणे असे प्रकार वाढू लागले. अवैध व्यवसायात सलीम हिप्परगी हे मटक्याच्या व्यवसायातील मोठे प्रस्थ होते. या व्यवसायातील पैशाच्या माध्यमातून वर्चस्व निर्माण करण्यासाठी सलीम हिप्परगी याचा खून करण्यात आला. ही घटना शहर हादरवणारी होती.

या खुनातील अनेकांची निर्दोष मुक्तता झाली. या खुनाचा पडद्यामागचा सूत्रधार संजय तेलनाडे असल्याचे पुढे आले. पोलिसांनी त्यावेळी त्याला ताब्यातही घेतले होते. मात्र पोलिसांच्या कारवाईपासून तो 'अर्थ'पूर्ण व्यवहारामुळे दूरच राहिल्याची आजही चर्चा आहे.

मटकाकिंग हिप्परगी याच्या खुनानंतर वहीफणी एजंट म्हणून काम करणारा संजय तेलनाडेचा गुन्हेगारी क्षेत्रातील प्रवास थक्क करणारा ठरला. यातूनच संजय तेलनाडे याच्या एस.टी. सरकार गँगचाही उदय झाला.

एस.टी. सरकार गँगचे प्रस्थ फोफावले

इचलकरंजी शहरातील गुन्हेगारी वाढण्यास ही गँगच पुढे कारणीभूत ठरली. अनेक प्रकरणांत पडद्यामागून तेलनाडे याच्या हालचाली सुरू असल्या तरी नानाविध कारणांनी तो कधीही पोलिसांच्या रेकॉर्डवर आला नाही. त्यामुळे एस.टी. सरकार गँगचे प्रस्थ फोफावत गेले.

मटक्यासह जुगार अड्ड्याचे प्रस्थही एस.टी.सरकार गँगने वाढवले. अनेक ठिकाणी विरोध केल्यानंतर प्रसंगी दहशत माजवून हे अवैध व्यवसाय बळकावण्यात आले. काही ठिकाणी पार्टनरशिप तत्त्वावर अवैध व्यवसायात आपले पाय रोवले. त्यातूनच संजय तेलनाडे हा अवैध व्यवसायात वरचढ ठरला.

याबरोबरच दहशत निर्माण करण्यासाठी खून, खुनाचे प्रयत्न आदींची मजलही या गँगची वाढली. त्यातूनच त्याने इचलकरंजीसह कर्नाटक व गोवा राज्यापर्यंत मटका, क्रिकेट बेटिंग आदींचे जाळे निर्माण केले. अवैध व्यवसायातील संपत्तीच्या व दहशतीच्या बळावर त्याने आपला मोर्चा शहरातील अन्य व्यवसायांकडे वळवला.
(क्रमश:)

खून करून सुटता येते याचा पायंडा

सलीम हिप्परगी याच्या खून प्रकरणात संशयितांची निर्दोष मुक्तता झाली. मात्र यावेळी पोलिस तपास अधिकार्‍यांवर न्यायालयाने चांगलेच ताशेरे ओढले. गुन्हेगारांना पाठीशी घालण्याच्या पोलिसांच्या प्रकारामुळे शहरातील शांततेला मात्र बाधा पोहोचली.

भ्रष्ट मार्गातून खून, खुनाचा प्रयत्न अशी रक्तरंजित मालिकाच सुरू करून तेलनाडे याच्या पाठोपाठ अनेक गुन्हेगारांनी शहरात दहशतीचे प्रस्थ निर्माण केले. खून करून सुटता येते हा संदेशच मिळाल्यामुळे गुन्हेगारांची भीतीच संपुष्टात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news