अंतराळात ही नववर्षाचे जल्‍लोषी स्वागत | पुढारी

अंतराळात ही नववर्षाचे जल्‍लोषी स्वागत

मॉस्को : रशियन अंतराळ संशोधन संस्था ‘रॉसकॉसमॉस’ने म्हटले आहे की यावर्षी अंतराळात एकूण दहा अंतराळवीरांनी नववर्षाचे जल्‍लोषी स्वागत केले. त्यापैकी सात अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर होते तर अन्य तिघेजण चिनी अंतराळस्थानक ‘तियानगोंग’मध्ये होते. अंतराळात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने अंतराळवीरांनी नवीन वर्षाचे स्वागत केले.

गेल्या 21 वर्षांच्या काळात 83 जणांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नववर्षाची पूर्वसंध्या घालवली आहे. त्यापैकी अनेक अंतराळवीरांनी हा अनुभव अनेक वेळा घेतलेला आहे. रशियन अंतराळवीर अँटोन श्काप्लेरोव्ह याने अंतराळ स्थानकावर चारवेळा नववर्षाचे स्वागत केले आहे. 2012, 2015,2018 आणि 2022 या वर्षांचे स्वागत त्यांनी अंतराळ स्थानकातून केले.

सध्या त्यांच्यासमवेत अन्य सहाजण अंतराळ स्थानकावर आहेत. चिनी अंतराळ स्थानकात हाई झिगांग, वांग यापिंग आणि ये गुआंगफू हे तिघेजण आहेत. यूरी रोमनेंको आणि जॉर्जी ग्रीको हे 1977-78 मध्ये अंतराळात नव्या वर्षाचे स्वागत करणारे पहिले अंतराळवीर होते.

Back to top button