कोल्हापूर : राधानगरी धरणाचा दरवाजा उघडून अडकला, नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग, दक्षतेचा इशारा (video) - पुढारी

कोल्हापूर : राधानगरी धरणाचा दरवाजा उघडून अडकला, नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग, दक्षतेचा इशारा (video)

राधानगरी : पुढारी वृत्तसेवा

आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास राधानगरी धरणाच्या दरवाज्याचे तांत्रिक काम सुरु असताना दरवाजा १८ फूट पूर्ण उघडून अडकला. त्यामुळे नदी पात्रात पाण्याचा अचानक विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे पंचगंगेसह अनेक नद्यांच्या पाणी पातळीत दिवसभरात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी पाटबंधारे खात्याची यंत्रणा जोरात कामाला लागली आहे. दुरुस्तीसाठी अनेक पथके रवाना झाली आहेत. नदीतील पाणी वाढणार असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

नदी काठावरील गावे, नदीवर जनावरे, धुणे धुवायला जाणाऱ्या व्यक्तींनी आज नदीकडे जाण्याचे टाळावे, अशी सूचना देण्यात आली आहे.

गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतावर आधारित पाणी सोडण्याची व्यवस्था आणि पाण्याच्या दबावावर उघड-झाप होणार्‍या स्वयंचलित दरवाजांचे वैशिष्ट्य असणारे राधानगरी धरण देशातील अजोड आणि एकमेव आहे. कोल्हापूर शहरापासून ३५ मैल अंतरावर राधानगरी गावाच्या पुढे भोगावती नदीचा प्रवाह अडवून हे अद्भुत धरण बांधले आहे.

‘नागरिकांनी घाबरू नये’

आज सकाळी राधानगरी धरणाच्या दरवाज्याचे तांत्रिक काम करत असताना दरवाजा उघडून अडकला. यामुळे नदी पात्रात पाण्याचा अचानक विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. पंचगंगेसह अनेक नद्यांच्या पाणी पातळीत दिवसभरात ३ ते ४ फुटाने वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज कोल्हापूर पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी व्यक्त केला आहे.

स्टार्टर स्वीच अचानक शॉर्ट होवून गेट आपोआप सुरू झालाची शक्यता तंत्रज्ज्ञांनी व्यक्त केली असून आज दिवसभरात कोणत्याही परिस्थितीत गेटची दुरुस्ती पूर्ण केली जाईल. तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी पाटबंधारे खात्याची यंत्रणा जोरात कामाला लागली असून या दुरुस्तीसाठी अनेक पथके रवाना झाली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

सध्या के. टी. वेअरचे पिलर काढण्याची सूचना संबंधितांना दिली आहे. त्याचबरोबर नदीतील पाणी वाढणार असल्याने नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे . नदी काठावरील गावे, नदीवर जनावरे, धुणे धुवायला जाणाऱ्या व्यक्तींनी आज नदीकडे जाण्याचे टाळून प्रशासनाला सहकार्य करावे. आज दिवसभरात या दरवाज्याची संपूर्ण दुरुस्ती करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.
– महेश सुर्वे, अधिक्षक अभियंता

पहा व्हिडिओ :

Back to top button