ख्रिसमस : प्राचीन शैलीतील देखणे ‘चर्च’ | पुढारी

ख्रिसमस : प्राचीन शैलीतील देखणे ‘चर्च’

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूरला लाभलेल्या ऐतिहासिक वारसास्थळांच्या मालिकेत ब्रिटिशकालीन चर्चना मानाचे स्थान आहे. नाताळच्या पूर्वसंध्येला मुख्य प्रार्थनेसाठी आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात येणार्‍या या चर्चना शतकोत्तर वर्षांचा इतिहास आहे. या चर्चच्या सोबतीनेच नव्यानेही काही चर्च सुरू झाले आहेत. पर्यटकांचे आकर्षण ठरत असणार्‍या ऐतिहासिक चर्चवर प्रकाश टाकणारा वृत्तलेख….

शहरात ख्रिश्चन बांधवांची संख्या लक्षणीय असून, येथील ऐतिहासिक चर्चमध्ये भक्तिभावाने भगवान प्रभू येशू ख्रिस्तांची उपासना केली जाते. वायल्डर मेमोरियल चर्च, ब—ह्मपुरीतील पवित्र सुवार्तिकांचे मंदिर, ऑल सेंट्स चर्च, होलिक्रॉस चर्च, सेंव्हथ डे चर्च, विक्रमनगर ख्रिस्ती समाज, ख्रिश्चन चर्च आदी चर्चेस येथे आहेत. यातील बहुतांश चर्च हेरिटेज वास्तूंच्या यादीत समाविष्ट आहेत.

वायल्डर मेमोरियल चर्च (महापालिका)

शहरातील सर्वांत जुने चर्च म्हणून वायल्डर मेमोरियल चर्च प्रचलित आहे. या चर्चची स्थापना 5 एप्रिल 1857 मध्ये अमेरिकन मिशनरी रेव्हरंड वायल्डर गोल्ड यांनी केली. महापालिकेच्या मागे असणार्‍या चर्चसाठी तत्कालीन बाबासाहेब महाराज यांनी विशेष मदत केली आहे. या चर्चसाठी लागणारा दगड रंकाळ्याच्या खणीतून स्वतः रेव्हरंड वायल्डर गोल्ड यांनी खोदून आणला.

त्यामुळे या चर्चला त्यांचेच नाव देण्यात आले. हे चर्च प्रोटेस्टंट पंथातील प्रेसबिटेरियन पंथाचे प्रतिनिधित्व करते. कालातंराने ही जागा अपुरी पडत असल्याने न्यू शाहूपुरी येथे काही वर्षांपूर्वी आणखी नवे चर्च बांधण्यात आले. कोल्हापूर शहरातील हे सर्वात मोठे चर्च आहे.

पवित्र सुवार्तिकांचे मंदिर (ब्रह्मपुरी)

ब्रह्मपुरी येथे ख्रिश्चन वसाहतींमध्ये पवित्र सुवार्तिकांचे मंदिर हे चर्चदेखील ब्रिटिशकालीन असून, त्यालाही शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. पन्हाळ्याकडून कोल्हापूर शहरात प्रवेश करतानाच पंचगंगा नदी ओलांडल्यानंतर हे ऐतिहासिक चर्च दिसते.

हे चर्चदेखील शहरात प्रसिद्ध असून, ते कोल्हापूर डायसिस कौन्सिलच्या अखत्यारित येते. मिशनरी सोसायटीअंतर्गत सन 1905 ला अ‍ॅग्लिकन चर्चची स्थापना करण्यात आली. यामध्ये रेव्ह.

हिटन यांचा पुढाकार होता. मार्टिन ल्युथर यांनी स्थापन केलेल्या प्रोटेस्टंट पंथातील अ‍ॅग्लिकन पंथाचे प्रतिनिधित्व हे चर्च करते. या चर्चच्या बांधकामालाही सव्वाशे वर्षांची परंपरा लाभली आहे.

ऑल सेंट चर्च (ताराबाई पार्क)

कोल्हापूरच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणारे हे चर्च सार्‍यांचे लक्ष वेधून घेते. बि—टिशकालीन देखण्या वास्तूमध्ये या वास्तूचा समावेश करावा लागतो. गोथील पद्धतीचे बांधकाम असलेल्या या चर्चच्या आजूबाजूला असलेल्या वृक्षसंपदेने अधिकच खुलून दिसते. या चर्चमध्ये काचेच्या तुकड्यांपासून प्रभू येशू ख्रिस्तांची प्रतिकृती साकारलेली आहे.

राजर्षी शाहू महाराज यांच्याकडून जमीन खरेदी करून त्या जागी बि—टिशांनी हे चर्च 1881 मध्ये बांधले असून, येथील फर्निचर, डायस व इतर साहित्यही त्या काळातील आहे. सुरुवातीला या चर्चमध्ये केवळ बि—टिश नागरिकच प्रार्थना करत असत. नंतर शाहू महाराजांनी हे चर्च सर्वांसाठी खुले केले.

वायल्डर मेमोरियल चर्च (न्यू शाहूपुरी)

महापालिकेच्या मागे असणार्‍या चर्चला शंभर वर्षे पूर्ण झाल्यावर न्यू शाहूपुरी येथे 1956 मध्ये वायल्डर मेमोरियल चर्चची स्थापना झाली. जुन्या चर्चमध्ये जागा अपुरी होती. आता या चर्चमध्ये एकावेळी 700 उपासक प्रार्थनेसाठी बसू शकतात.

चर्चच्या इमारतीचे बांधकाम दगडी व आकर्षक असून, या नवीन चर्चलाही 50 वर्षांचा इतिहास आहे. हे चर्च प्रोटेस्टंट पंथातील प्रेसबिटेरिअन पंथाचे प्रतिनिधित्व करते.

ख्राईस्ट चर्च (नागाळा पार्क)

नागाळा पार्कातील जिल्हाधिकारी कार्यालयानजीकच्या या चर्चलाही मोठी परंपरा आहे. शहरातील ख्रिश्चन परंपरेत भर घालणार्‍या या चर्चमध्ये दरवर्षी ख्रिस्तजन्माचा देखावा तसेच विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य स्वरूपात आयोजन केले जाते.

विक्रमनगर चर्च येथील चर्चलाही 50 हून अधिक वर्षांचा इतिहास आहे. पूर्वी छोट्या असलेल्या या चर्चचे नूतन बांधकाम 2000 मध्ये करण्यात आले.

सेंट फ्रान्सिस झेवियर्स चर्च (होलिक्रॉस चर्च)

शहरातील कॅथॉलिक चर्च म्हणजे फ्रान्सिस झेवियर्स चर्च. रोमन कॅथॉलिक पंथाचे प्रतिनिधित्व करणारा हा पंथ पोपला मानणारा आहे. या पंथातील 300 हून अधिक कुटुंबीय कोल्हापुरात आहेत.

1869 मध्ये फादर विन्संट डिसुजा यांच्या काळात 1975 मध्ये नव्या चर्चची स्थापना करण्यात आली. या चर्चच्या बरोबरीने रुकडी आणि इचलकरंजी येथेही या पंथाचे चर्च आहेत. या चर्चच्या स्थापनेवेळी आर्किरेटक्ट बेरी यांनी इमारतीचे डिझाईन बनवले होते. जगभरातील ख्रिश्चन धर्मीयांत या चर्चला विशेष महत्त्व आहे.

Back to top button