कोल्हापूर : कोरे-महाडिक-आवाडे यांच्यात तासभर खल | पुढारी

कोल्हापूर : कोरे-महाडिक-आवाडे यांच्यात तासभर खल

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : आमदार विनय कोरे, आ. प्रकाश आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर रविवारी एकत्र येत सुमारे तासभर सखोल चर्चा केली. माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा बँकेच्या राजकारणापासून तालुकावार विधानसभेचे राजकारण आणि महाविकास आघाडीतील सुंदोपसुंदीसह संस्थात्मक राजकारणावर चर्चा झाली.

वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी कोरे-महाडिक-आवाडे हे एकत्र आले आहेत. कोल्हापुरात एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी पॅनेलची घोषणा केली. तत्पूर्वी खुर्चीवर बसतानाच महादेवराव महाडिक यांना विनय कोरे यांनी मध्ये बसण्याची विनंती केली. त्यावर महाडिक यांनी सावकार तो आपला मान आहे, असे म्हणत आ. आवाडे आणि आपल्यामध्ये महाडिकांनी आ. कोरे यांना बसवले.

यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधल्यानंतर चहापान घेण्याच्या निमित्ताने आ. कोरे, आ. आवाडे, महाडिक आणि प्रा. जयंत पाटील एकाच टेबलवर बसले. यावेळी जिल्ह्यातील अनेक घडामोडींवर चौघांनी मते व्यक्त केली. जिल्ह्याच्या राजकारणावर चौघांमध्ये साधक-बाधक चर्चा झाली. यावेळी माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह बाजार समितीचे संचालक आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी चर्चेत हस्तक्षेप न करता नेत्यांना मोकळा वेळ दिला.

Back to top button