Education and Health : शिक्षण-आरोग्य समन्वयाची गरज

Education and Health : शिक्षण-आरोग्य समन्वयाची गरज
Published on
Updated on

1 ली ते 4 थीचे ऑफलाईन वर्ग भरू लागले आहेत. फक्त कोल्हापूर जिल्ह्यात 1 ली ते 4 थीच्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 2 लाख 22 हजार आहे. यावरून महाराष्ट्रातील संख्येचा अंदाज येतोच. एवढ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे तितकीच दक्षता व आरोग्य सुरक्षिततेची काळजी घ्यावी लागेल. (Education and Health)

घरात कंटाळलेल्या मुलांना शाळा सुरू झाल्याने आनंद झाला आणि पालकही खूश झाले असले तरी त्यांना धाकधूक व काळजी आहे ती नव्या विषाणूची. पालकांनी मुलांना मास्क घालण्याचे वळण, स्वच्छतेबद्दलची शिस्त व जागरूक राहण्याच्या त्यांना समजेल अशा सूचना देण्याची गरज आहे. दुसरे म्हणजे मुलांना शाळेच्या गेटपाशी सोडून चालणार नाही, तर त्यांची बैठक व्यवस्था, पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहाची उपलब्धता, वर्गाचीही स्वच्छता याची पडताळणी करणे गरजेचे आहे. शिवाय पालक सभेमध्ये त्यांची चर्चा व्हावी आणि पालक संघटनांमध्येसुद्धा विचार व्हावा.

दुसरे म्हणजे मधल्या सुट्टीतील डबा आणू नये, असे निर्देश शाळांनी दिले आहेत. काही शाळा ती मुभा देत आहेत. मात्र, चार तास शाळा असावी अशी अपेक्षा वा धोरण असले तरी शाळेत येण्या-जाण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता, मुलांचे वय लक्षात घेता, कोरडे खाणे देण्यास मुभा असावी असे वाटते. शाळेची वेळ, शिफ्टने शाळा की सलग सर्व मुले एकत्र बसवून अध्यापन, वर्गाची रचना, मधली सुट्टी, टिफीन यांसारखे सर्व निर्णय शाळा व्यवस्थापन समितीच्या सल्ल्याने मुख्याध्यापकांनी शिक्षकांशी चर्चा करून घ्यावेत, अशी अपेक्षा.

स्थानिक पातळीवर शिक्षण खात्यावरची जबाबदारी वाढली आहे. व्यवस्थापनातील कुचराई, सुपरव्हिजनमधील शिथिलता ही मुलांच्या जीवाशी खेळ होऊ शकेल. कोरोना काळात म्हणजे तीव्र लाट असताना जे काटेकोर निर्बंध व त्याचे पालन केले जात असे, तशाच प्रकारची जागरूकता, दक्षता आणि प्रशासनाचीही तत्परता हवी. प्रशासन सक्रिय, सावध हवे. (Education and Health)

शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यात समन्वय हवा. परस्परांशी संबंध इष्टतेचे आणि सततचा संपर्क हवा. स्थानिक आरोग्य केंद्राधिकारी व व्यवस्थापकीय सेवक यांची नियमित व वेळेवर उपस्थिती हवी. मुलांची आरोग्य तपासणी व्हावी. शिक्षण खाते व आरोग्य खाते सक्षम व अधिक जागरूक हवे. आरोग्य खात्याचे सर्वंकष गुणवत्ता व्यवस्थापन हवे. केवळ पालकांचे हमीपत्र घेऊन चालणार नाही. कारण, त्यामुळे शाळा व्यवस्थापन व आरोग्य खाते यांचीही बांधिलकी कमी होत नसून ती अधिकच वाढते. शाळा कोणत्या दक्षता घेत आहे, याचा दर्शनी फलक लावावा. तसेच पालकांनी काय दक्षता घ्यावी, याचा लेखी सूचना फलक लावणे गरजेचे आहे. दुसरे म्हणजे शाळेत पाणी व हात धुण्याची व्यवस्था, जंतुनाशक, हात धुण्यासाठी साबण, स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेसाठी डिटर्जंट पावडर उपलब्ध होणे आवश्यक आहे.

'स्वच्छ शाळा-सुरक्षित मुले' हे अभियान राबवायला हवेच. मुले केंद्रबिंदू ठेवून स्वच्छता हे सूत्र घेऊन आरोग्य-संरक्षण हेच ध्येय घेऊन शाळा व्यवस्थापन समिती सज्ज व दक्ष हवी. शिक्षक मित्र, पालक मित्र, गृहभेटी अशा माध्यमांतून शिक्षण सुरू ठेवणे आवश्यक आहे. खरे तर शाळेत समुपदेशक हवा. कारण, मुला-मुलांची मानसिकता काहीशी गोंधळलेली, दबावाखाली असणे स्वाभाविक आहे. परस्परविरोधी विधाने व सूचनाही त्यांच्या कानावर पडतात. मुलांचा आत्मविश्वास वाढेल. निर्णयात ठामपणा येईल आणि सकारात्मक विचार कसे वाढतील हेच पाहावे लागेल. (Education and Health)

शासनाने ऑफलाईन शिक्षणाबरोबर ऑनलाईन शिक्षणाचीही सुविधा सुरू राहील, असे धोरण निश्चित केले आहे. मात्र, अशी ऐच्छिकता ठेवणे तितकेसे इष्ट नाही. त्यामुळे काही मुलांना ऑनलाईची मुभा ठेवल्यास शिक्षणकांच्या अध्ययनाच्या टाईमटेबलमध्ये अडचणी, वेळ सांभाळण्याची कसरत, अध्यापनाचा दर्जा भिन्न असे प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे शिक्षणात एकवाक्यता येण्यासाठी 1 ली ते 4 च्या सर्वांनाच ऑफलाईन शिक्षण धोरण उचित ठरेल का? याचा विचार व्हायला हवा. शाळेत बैठे खेळ, व्यायाम, कविता व कथा वाचन व कथन, कातरकाम, गोष्टी सांगण्यास प्रेरणा देणे व ऐकवणे, मिसळलेले धान्य निवडणे, नाच-गाणी यांसारख्या उपक्रमांवर भर द्यावा.

– डॉ. लीला पाटील

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news