District Bank Election : शह-काटशहाच्या राजकारणात गटा-तटाला महत्त्व

District Bank Election : शह-काटशहाच्या राजकारणात गटा-तटाला महत्त्व
Published on
Updated on

कोल्हापूर ; संतोष पाटील : (District Bank Election) सत्ताधारी आघाडीच पुन्हा बँकेत कारभारी होणार असल्याचे स्पष्ट आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आपला वाटा मित्रांना किती देणार आणि शिवसेना किती मागे हटणार, यावर बिनविरोधाचे गणित अवलंबून आहे. या पार्श्‍वभूमीवर जनसुराज्य पक्षाला सन्मानजनक वाटा हवा आहे.

आ. प्रकाश आवाडे, माजी आ. महादेवराव महाडिक हे संचालकपदाचे हक्‍कदार मानले जातात. राजू शेट्टी यांच्यासह तालुक्यात असलेल्या मातब्बरांची स्वत: किंवा समर्थकांसाठी संचालकपदाची मागणी आहे. बिनविरोध न होणार्‍या गटात समर्थकांमार्फत निवडणूक लावून आडकाठी घातली जाणार आहे.

गगनबावड्यातून पालकमंत्री सतेज पाटील यांच्या निवडीची घोषणा होणे बाकी आहे. आजरा तालुक्यात संचालक अशोक चराटी पुन्हा बाजी मारणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. भुदरगड तालुक्यात के. पी. पाटील यांच्यासह दहा उमेदवार इच्छुक आहेत. चंदगड तालुक्यातून संचालक आ. राजेश पाटील पुन्हा बँकेत येण्याच्या तयारीत आहेत. गडहिंग्लजमधून संचालक संतोष पाटील यांच्यासह सहाजण रिंगणात आहेत. (District Bank Election)

हातकणंगले तालुक्यातून माजी आ. अमल महाडिक आणि संचालक महादेवराव महाडिक यांच्यापैकी एकजण संचालक होईल. करवीर तालुक्यातून आ. पी. एन. पाटील यांची निवड बिनविरोध होणार की 251 पैकी 230 पेक्षा अधिक मते घेणार, इतकाच विषय शिल्‍लक आहे. कागल तालुक्यातून ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे संचालकपद निश्‍चित असले, तरी भाजपने माघार घेतल्यास बिनविरोध होईल. पन्हाळ्यातून आ. विनय कोरे यांची बाजू भक्‍कम आहे.

राधानगरीतून ए. वाय. पाटील यांची बिनविरोधाकडे वाटचाल सुरू आहे. शाहूवाडी तालुक्यात संचालक सर्जेराव पाटील आणि मानसिंग गायकवाड यांच्यात पुन्हा थेट लढत होईल. शिरोळचा तिढा न सुटल्यास महाविकास आघाडीतच निवडणूक होईल. राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या पुढे राजू शेट्टी यांच्या मदतीने काँग्रेसचे गणपतराव पाटील यांनी कडवे आव्हान उभे केले आहे.

प्रक्रिया गटातून संचालक खा. संजय मंडलिक यांच्या जोडीला आ. प्रकाश आवाडे, संचालक बाबासाहेब पाटील की प्रदीप पाटील-भुयेकर यांच्यापैकी कोण? हे तडजोडीच्या राजकारणात ठरेल. आ. कोरे हे या गटासह बँक-पतसंस्था गटासाठी आग्रही आहेत. इतर शेती संस्था आणि व्यक्‍ती सभासद गटात संचालक प्रताप माने यांच्यासाठी राष्ट्रवादीचा आग्रह कायम राहील. महिला गटातील 29 उमेदारांपैकी माजी खासदार निवेदिता माने यांचे संचालकपद निश्‍चित आहे. (District Bank Election)

तर काँग्रेसच्या उदयानी साळुंखे यांनी जोरदार प्रयत्न सुरू ठेवले आहेत. इतर मागासवर्गीय गटातील इच्छुक 35 उमेदवारांपैकी कोणाला लॉटरी लागणार, याकडे लक्ष आहे. भटक्या विमुक्‍त जाती-जमाती गटात 19 उमेदवार असून, या जागेवर स्वाभिमानीने जोर लावला आहे. बँका-पतसंस्था गटात आ. आवाडे, संचालक अनिल पाटील, प्रा. जयंत पाटील, अर्जुन आबिटकर यांच्यात रस्सीखेच आहे.

उट्टे निघणार..!

गगनबावडा, करवीर, हातकणंगले, पन्हाळा, कागल, राधानगरी विकास गटासह इतर शेती संस्था गट, प्रक्रिया आणि महिला गटातील एका जागेवरील निवड स्पष्ट आहे. शिरोळ, शाहूवाडी, आजरा, गडहिंग्लज, चंदगड, भुदरगड येथील लढतींचे चित्र लवकरच स्पष्ट होईल.

प्रक्रिया आणि महिला गटातील प्रत्येकी उरलेली एक जागा, अनुसूचित जाती, भटक्या जाती, ओबीसी, दूध संस्था आणि बँक-पतसंस्था गटासाठी बिनविरोधाची शक्यता कमी असून, आघाडी आणि गटा-तटाच्या समर्थनावर होणार्‍या लढतींतून एकमेकांचे उट्टे काढले जातील. यातून अनेक ठिकाणी धक्‍कादायक निकालाची परंपरा कायम राखली जाईल, असे सध्याच्या घडोमोडी दर्शवतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news