कोल्हापूर : हसणेच्या जंगलात टस्करचा मुक्काम; पथक मागावर

 हसणेच्या जंगलात टस्कर तळ ठोकून आहे.
हसणेच्या जंगलात टस्कर तळ ठोकून आहे.

गुडाळ, पुढारी वृत्तसेवा: मागील महिन्यात 12 मेरोजी राधानगरी तालुक्यात प्रवेश केलेल्या टस्करचा मुक्काम काळम्मावाडी आणि राधानगरी जलाशयाच्या मधोमध असलेल्या हसणेच्या जंगलात आहे. हसणे नजीकच्या देवराई परिसरात बांबू, माड, उंबर, जांभूळ असे आवडते खाद्य आणि मुबलक पाणी उपलब्ध असल्याने तो तेथेच रुळला आहे.

पावसाळ्यात टस्कर येथील मुक्काम हलवेल

दरम्यान, हा परिसर अतिवृष्टीचा असून जेव्हा पावसाचा जोर सुरू होईल आणि या जंगल परिसरात जेव्हा भुंगे उठतील तेव्हा टस्कर येथील मुक्काम हलवून एकतर येथूनच परतीच्या वाटेला जाईल किंवा पूर्वानुभवाप्रमाणे राधानगरी जलाशय पार करून कारीवडे, मानबेट मार्गे गगनबावडा तालुक्यात जाईल, असा वन्यजीव विभागाचा अंदाज आहे.

वाकीघोल परिसरातील सावर्देच्या जंगलात तीन-चार दिवस मुक्काम

महिन्याभरापूर्वी भुदरगडच्या कोंडोशी लघुपाट बंधारे प्रकल्पाच्या परिसरातून राधानगरी तालुक्याच्या वाकीघोल परिसरातील करपेवाडी -दुबळेवाडी हद्दीत या टस्करने प्रवेश केला होता. त्यानंतर वाकीघोल परिसरातील सावर्देच्या जंगलात तीन-चार दिवस मुक्काम ठोकून काळम्मावाडीच्या बॅक वॉटर मधून हसणे परिसरात हा टस्कर आला.

वन्यजीव विभागाचे एक पथक टस्करच्या मागावर

२०१८ मध्ये या परिसरात दाखल झालेल्या टस्करने राधानगरी- फोंडा राज्य मार्ग ओलांडून राधानगरी जलाशयातून पोहत पैलतीराला जात कारिवडे – मानबेट धनगरवाडा मार्गे गगनबावडा तालुक्यात प्रवेश केला होता. तेथील काही महिन्याच्या वास्तव्यानंतर हा टस्कर आल्या वाटेनेच परत भुदरगडला गेला होता. वन्यजीव विभागाच्या मते हा टस्करचा भ्रमण मार्ग आहे. त्यामुळे हा टस्करही भ्रमण मार्गाने पुढे जाऊ शकतो.

वन्यजीव विभागाचे एक पथक टस्करच्या मागावर असून अनुकूल नैसर्गिक परिस्थिती आणि मुबलक खाद्य उपलब्ध असल्याने टस्कर हसणे परिसरातच स्थिरावला असल्याची माहिती दाजीपूर वन्यजीव विभागाचे परिक्षेत्र वनाधिकारी अजित माळी यांनी 'दै. पुढारी'शी बोलताना दिली.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news