कोल्हापूर, हुपरी परिसरात बनावट सोन्याचा कारखाना?

कोल्हापूर, हुपरी परिसरात बनावट सोन्याचा कारखाना?

[author title="सचिन टिपकुर्ले" image="http://"][/author]

कोल्हापूर : बँकांच्या फसवणुकीसाठी लागणारे बनावट सोने तयार करून देणारा कारखाना कोल्हापूर व हुपरी परिसरात सुरू असल्याची चर्चा आहे. येथे मागणीप्रमाणे विविध प्रकारचे अलंकार तयार करून दिले जातात. सोन्याच्या पाण्याचा मुलामा मारून तयार केलेले अलंकार एखाद्या सराफाच्या नजरेलाही सापडणार नाही, अशा शिताफीने हे दागिने तयार केले जात असून, यातून बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात येत आहे.

बनावट सोने तारण ठेवून बँकांची फसवणूक करण्याचे प्रकार पूर्वी सहकारी बँकांंत मोठ्या प्रमाणात घडत होते; पण आता राष्ट्रीयीकृत बँकांचीही कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

बाजारात मिळणारे सोने हे 18, 22 ते 24 कॅरेटमध्ये मिळते; पण केवळ सोन्याच्या पाण्याचा मुलामा देऊन बनावट सोने तयार करून देणारी टोळी कोल्हापूर परिसरात कार्यरत आहे. या टोळीचे नेटवर्क महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यांत पसरले आहे. मागणीप्रमाणे ते अलंकार करून देतात. कोल्हापूर व हुपरी परिसराच्या मध्ये हा कारखाना सुरू असल्याची चर्चा आहे.

ठराविक प्रकारचे व केवळ सोन्याच्या पाण्याचा मुलामा देऊन चेन, बिल्वर, पाटल्या, मणी मंगळसूत्र दागिने तयार केले जातात. हे अलंकार इतक्या शिताफीने केलेले असतात की अनुभवी सराफही ते ओळखू शकत नाही. या बनावट दागिन्यावर हॉलमार्क शिक्केही मारून मिळतात.

सराफ ठरतात बळीचा बकरा

अनेकवेळा बळीचा बकरा सोन्याचे मूल्यांकन करणारे सराफ होतात. तर काही प्रकरणात मूल्यांकन करणार्‍या सराफाला हाताशी धरूनच बँकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. बँका व वित्तीय संस्था सोने तारण कर्जाची मुदत संपल्यानंतर दागिने लिलावात काढतात. सोने वितळल्यावर त्यात किती प्रमाणात तांबे व चांदी आहे ते समजते. तेव्हा ही फसवणूक लक्षात येते.

आमच्यापर्यंत यायचे नाही

शहरातील एका भागात चोरीचे सोेने निम्म्या किमतीने घेऊन त्याचे मणी तयार केले जातात. नंतर हे मणी कारखान्यात पाठवून सोने वितळवून त्या सोन्याचा वापर बनावट सोने तयार करण्यासाठी केला जातो. यात कोणी सापडले तर हे प्रकरण परस्पर मिटावायचे, आमच्यापर्यंत यायचे नाही, अशी धमकी दिली जाते. त्यामुळे आजपर्यंत जे संशयित सापडले, त्यांच्याकडून सत्य बाहेर पडले नाही. त्यामुळे बनावट सोने सापडते; पण तयार करणारा कारखाना सापडत नसल्याची चर्चा आहे.

असे तयार होतात बनावट दागिने

तांबे किंवा चांदीचा वापर करून त्यावर 1 ते 3 ग्रॅमचे सोन्याचे आवरण लावले जाते. हे सोने कानशीने घासले तरी खरे वाटते. हे फॉर्मिंग दागिने सहजासहजी ओळखता येत नाहीत. अशा दागिन्यांना खोलवर उभा छेद देऊन नायट्रिक अ‍ॅसिड टेस्ट करावी लागते, तरच आतील हलका धातू लगेच ओळखता येतो; परंतु दागिन्याच्या वजनात तूट येते म्हणून अशी पद्धत वापरली जात नाही. याचाच गैरफायदा बनावट सोने तारण ठेवणारे घेतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news