गडहिंग्लजकरांच्या प्रेमाने भारावले थॉमस, कार्लोस | पुढारी

गडहिंग्लजकरांच्या प्रेमाने भारावले थॉमस, कार्लोस

गडहिंग्लज : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात कोल्हापूरनंतर गडहिंग्लज हे सर्वाधिक फुटबॉलप्रेमी असलेले शहर म्हणून परिचित आहे. या ठिकाणी स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित केल्या जातात. देशभरातील विविध राज्यातील नामवंत खेळाडूंनी ऐतिहासिक एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर आपला खेळ दाखविला आहे. दोन दिवसापूर्वी पार पडलेल्या आंतरराज्यीय स्पर्धेत स्थानिक जय गणेश एफसीच्या संघातून सहभागी झालेल्या दोघा दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या खेळाला गडहिंग्लजकरांनी मोठी दाद दिली. हलगीच्या तालावर मिरवणूक काढून गडहिंग्लजकरांनी दाखविलेल्या प्रेमाने दोन्ही खेळाडू चांगलेच भारावून गेले.

दोन दिवसापूर्वी विनर्स फुटबॉल क्लबकडून एकूण २ लाखांवर बक्षिसे असलेली आंतरराज्यीय फुटबॉल स्पर्धा झाली. यामध्ये स्थानिक गडहिंग्लजच्या संघांसह कोल्हापूर, बेळगाव, गोवा, पुणे, हुबळी, मुंबई या ठिकाणचे १६ संघ सहभागी झाले होते. मात्र यामध्ये गडहिंग्लजच्या जय गणेश एफसीमधून खेळलेले थॉमस ज्यो ज्यो व कार्लोस हे खेळाडू खास आकर्षण ठरले.

गडहिंग्लजमध्ये पहिल्यांदाच स्थानिक पातळीवरील संघातून परदेशी खेळाडू खेळणार असल्याने प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. अंतिम सामन्यात जय गणेशच्या थॉमस या २२ वर्षीय खेळाडूच्या खेळाला फुटबॉलशौकिनांनी उत्स्फूर्त दाद दिली. ज्या ज्या वेळी चेंडू थॉमसकडे यायचा त्या त्या वेळी प्रेक्षकांनी टाळ्या, शिट्ट्यांनी त्याला जोरदार प्रोत्साहन दिले. जय गणेशला विजेतेपदाने थोडक्यात हुलकावणी दिली. मात्र त्यांच्याकडून खेळलेल्या थॉमसला उत्कृष्ट खेळाडूचा बहुमान मिळाला. पारितोषिक वितरणावेळी तर त्याने चक्क ‘क्यूँकी तुम ही हो’ हे बॉलिवूड गीत सादर करुन सर्वांनाच अवाक् केले.

प्रारंभी आयोजकांनी कोल्हापुरी फेटे बांधून केलेला सन्मान… खेळावेळी मिळालेली उत्स्फूर्त दाद… जय गणेशच्या व्यवस्थापनाने चषकासह हलगीच्या निनादात जीपवरुन काढलेली मिरवणूक…. महिलांनी औक्षण करुन केलेले त्यांचे स्वागत… या सर्वामुळे दोन्ही परदेशी खेळाडू चांगलेच भारावून गेले. त्यांनी मिरवणुकीवर हलगीच्या ठेक्यावर जोरदार नृत्य करत आपला आनंद व्यक्त केला. आपण गडहिंग्लजला खेळायला पुन्हा नक्की येऊ… असा शब्द देऊन ते माघारी परतले.

Back to top button