कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : बँकेचे राजकारण पक्षविरहित राहील : मुश्रीफ | पुढारी

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : बँकेचे राजकारण पक्षविरहित राहील : मुश्रीफ

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा बँकेत ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) मागील सहा वर्षांत पक्षीय राजकारण बाजूला ठेवून काम केले. सर्वांच्या साथीने आर्थिक अरिष्टातून बँकेला बाहेर काढले. शेतकर्‍यांची आर्थिक वाहिनी असलेल्या जिल्हा बँकेत कोणीही राजकारण आणू नये. जिल्हा बँकेचे राजकार पक्षविरहित असून यापुढेही ते ठेवू, सर्वांशी चर्चा करून अधिकाधिक जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न राहील, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी सांगितले.

कागल तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून संचालक, खा. संजय मंडलिक आणि भैया माने यांच्यासह ना. मुश्रीफ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ना. मुश्रीफ म्हणाले, प्रत्येक तालुक्यात अनेक दिवसांचे राजकारण असल्याने तेथील  ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) निवडणुका बिनविरोध होणार नाहीत. अधिकाधिक जागा बिनविरोध करण्यासाठी सर्व घटकांशी चर्चा सुरू आहे. एकोपा राखला जाईल.

बँक ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) तोट्यातून बाहेर काढत दीडशे कोटी नफा झाला आहे. शेतकर्‍यांना पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले. कामगार हिताचे निर्णय घेतले. आयकर भरणारी जिल्हा बँक प्रथम क्रमांकावर आहे. नोटाबंदी काळात पावणे तीनशे कोटी रुपयांच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेने स्वीकारल्या नव्हत्या. अद्याप 25 कोटी पडून आहेत. त्यातूनही जिल्हा बँकेने मात केली. जिल्हा बँकेने म्हशी खरेदीसाठी गोकुळच्या माध्यमातून कर्ज योजना जाहीर केल्यानंतर दोन महिन्यात दीड लाख लिटर दुधाचे संकलन वाढले असल्याचे ना. मुश्रीफ यांनी नमूद केले.

‘गोकुळ’चा तो पराभव दुर्दैवी ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )

गोकुळच्या निवडणुकीत वीरेंद्र मंडलिक यांचा पराभव झाला होता. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विशेष काळजी घेणार काय? या प्रश्नावर मुश्रीफ म्हणाले, दुर्दैवाने गोकुळच्या निवडणुकीत ते घडले. भविष्यात त्याच्या भरपाईसाठी प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत अनेक वेळा कागल तालुक्याने जिल्हा बँकेचे नेतृत्व केले आहे. आम्ही, खा. संजय मंडलिक आणि संजयबाबा घाटगे असे तिघे तालुक्यातून एकत्र असल्याने 95 टक्के मते आमच्या बाजूने आहेत. पॅनेलमध्ये कागल तालुका प्रथम क्रमांकावर असेल.

Back to top button