Kolhapur News : दत्तवाड येथील दूधगंगा नदीचे पात्र महिन्यात तिसऱ्यांदा कोरडे; पाण्याचा प्रश्न गंभीर | पुढारी

Kolhapur News : दत्तवाड येथील दूधगंगा नदीचे पात्र महिन्यात तिसऱ्यांदा कोरडे; पाण्याचा प्रश्न गंभीर

दत्तवाड; पुढारी वृत्तसेवा : दत्तवाड (ता. शिरोळ) येथील दूधगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यात तिसऱ्यांदा कोरडे पडले. यामुळे दतवाडसह घोसरवाड, नवे व जुने दानवाड आणि टाकळीवाडी गावांमध्ये शेतीसाठी आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. (Kolhapur News)

दहा दिवसांपूर्वीच दूधगंगा नदी पात्रात पाणी होते. सद्यस्थितीत उन्हाचा तडाका वाढल्याने पाण्याची गरजही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे क्रमपाळीनुसार पाण्याचे नंबर येण्यापूर्वीच नदीपात्रातील पाणी संपल्याने शेतातील पिके जगवायची कशी ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पिण्याच्या व इतर घरगुती कामासाठीच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी या परिसरातील नागरिकांना विहिरी, कुपनलिका व बोरवेल्स चा आधार घ्यावा लागत आहे. मात्र वारंवार नदीपत्रातील पाणी संपू लागल्याने विहिरी व बोरवेल्स मधीलही पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. मार्च महिन्यातच ही परिस्थिती तर एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात काय परिस्थिती होईल याची भीती नागरिक व शेतकऱ्यांना चिंताग्रस्त करीत आहे. (Kolhapur News)

गतवर्षी दूधगंगा नदीचे पात्र तब्बल दहा वेळा कोरडे पडले होते. त्यावेळी गावातील बहुतांश विहिरीने तळ गाठले होते. तर निम्म्यांहून अधिक गावातील बोरवेल्स पाण्याअभावी बंद पडले होते. नागरिकांची पाण्याची गरज भागवण्यासाठी ग्रामपंचायतीला चक्क नदीपात्रात बोर मारावे लागले होते. दत्तवाड येथील दत्तवाड मलिकवाड व दत्तवाड एकसंबा या बंधाऱ्यावरील बर्गे जीर्ण झाले आहेत. त्यामुळे पाटबंधारे खात्याने तत्काळ या बंधाऱ्यावरील बर्गे नवीन व अधिक उंचीचे बसवणे गरजेचे आहे. तसेच कर्नाटक व महाराष्ट्रातील अनेक गावात नदीपत्रात पाणी आल्यानंतर अडवले जाणारे पाणी प्रवाहित करावे. दत्तवाड हे दूधगंगा नदीवरील महाराष्ट्रातील शेवटचे गाव असल्याने पाणी अडवण्यासाठी येथे भक्कम व्यवस्था करण्याचा विचार होणे गरजेचे आहे. अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

….अशा परिस्थितीतही इचलकरंजीकर पाणी घेणार का?

दूधगंगा नदी वारंवार कोरडी पडूल्याने नदी काठाची भीषण वास्तविकता समोर असतानाही इचलकरंजीकरांना दूधगंगेतीलच पाणी हवे का ? अशी चर्चा सर्व स्तरातून होत आहे. त्यामुळे यापुढील काळात इचलकरंजीसह दूधगंगा नदी काठ सोडून इतर कोणतीही पाणी योजना दूधगंगेतून होऊ देणार नाही असा निर्धार दत्तवाड परिसरातून तसेच दूधगंगा नदी काठावरून व्यक्त होत आहे.

हेही वाचा :

Back to top button