Kalmmawadi Dam
सरवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) : काळम्मावाडी धरण परिक्षेत्रात सुरु असलेल्या धुवाँधार पावसामुळे काळम्मावाडी धरण बुधवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत ८२.९४ टक्के भरले. धरणाची पाणीगळती काढण्याचे काम सुरु असल्यामुळे धरण शंभर टक्के क्षमतेने भरले जाणार नाही. यामुळे धरणाच्या वक्राकार पाच दरवाजांतून नदीपात्रात ४ हजार, लिकेजमधून १०० तर पॉवर हाऊसमधून १,५०० असा एकूण दर सेकंदाला ७,६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग दुधगंगा नदीत होत आहे. या नदीवरील पंडेवाडी, सुळंबी, तुरंबे, कसबा वाळवे हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दुधगंगा नदी पात्राबाहेर पडलेली आहे. यामुळे नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत.
धरणाची पाणीपातळी ६४२.२६ म्हणजे २५.३२ टीएमसी आहे. सध्या धरण हे ५९६.४३ एवढे म्हणजे २१.०६ टीएमसी पाण्याने भरलेले आहे. आजपर्यंत धरण परिक्षेत्रात २,७७९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासांत १५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा सरी कोसळत आहेत.
दुधगंगा नदीवरील बंधारे पाण्याखाली गेले असल्यामुळे नदी पलीकडील गावांचा संपर्क तुटला आहे. अजुनही दुधगंगा काठावर पुरसदृश परिस्थिती असल्यामुळे नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.