कोल्हापूर : मंडल अधिकार्‍यांंच्या आदेशाची यापुढे तत्काळ अंमलबजावणी | पुढारी

कोल्हापूर : मंडल अधिकार्‍यांंच्या आदेशाची यापुढे तत्काळ अंमलबजावणी

अनिल देशमुख

कोल्हापूर : मंडल अधिकारी स्तरावर (सर्कल) सुरू असणार्‍या दाव्यांच्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या निर्णयावर 60 दिवसांचा अपील कालावधी असतो. पण या कालावधीची प्रतीक्षा करू नये, अशा आशयाचे परिपत्रक महसूल विभागाने काढले आहे. यामुळे अपील कालावधीमुळे प्रलंबित राहणार्‍या विविध प्रकारच्या फेरफारचा अंमल तत्काळ होणार आहे.
सात-बारा उतार्‍यावर खरेदीपत्र, मृत्युपत्र, दत्तकपत्र, वाटणीपत्र, वारसा आदींच्या विविध प्रकारच्या फेरफार नोंदी होत असतात. या फेरफार नोंदीसाठी दिलेल्या अर्जावर अनेकदा तक्रारी येत असतात. हे प्रमाण मोठे असते. या तक्रारीवर (दावे) मंडळ अधिकार्‍यांकडे न्यायालयीन प्रक्रियेप्रमाणेच सुनावणी होते. काही तक्रारीत दोन-तीन महिन्यात निकाल लागतो तर काही प्रकरणात वर्षभराहूनही अधिक कालावधी जातो.

मंडळ अधिकार्‍यांनी दिलेल्या निर्णयानंतर विरोधी निकाल लागलेल्या पक्षकाराला तहसीलस्तरावर अपील करता येते. याकरीता निकाल दिलेल्या तारखेपासून 60 दिवसांचा कालावधी असतो. हा कालावधी पूर्ण झाल्याखेरीज मंडळ अधिकार्‍यांनी दिलेल्या निर्णयाची अमंलबजावणी केली जात नव्हती. आता मात्र, तसे होणार नाही. मंडळ अधिकार्‍यांनी दिलेल्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी होणार आहे. त्यानूसार फेरफार मंजूर होऊन, त्यानूसार नोंद सातबारा उतार्‍यावर केली जाणार आहे.

अपील कालावधीत संबधिताना वरिष्ठ कार्यालयाकडे दाद मागता येईल. त्या कार्यालयाकडून मंडळ अधिकार्‍याच्या निर्णयाबाबत जो पुढील निर्णय होईल, त्यानूसार पुढील नोंदी करता येणार आहेत. हा निर्णयाने फेरफार नोंदी प्रलबिंत राहण्याचे प्रमाण कमी होणार आहे.

हजारो प्रकरणे प्रलंबित

सध्या राज्यात मंडल अधिकार्‍यांकडे असणार्‍या तक्रारी आणि निर्णयानंतर अपील कालावधीमुळे फेरफार नोंदी होत नसल्याने प्रलंबित असलेल्या प्रकरणांची संख्या ही हजारोंच्या घरात आहे. फक्त कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर फेब—ुवारी महिनाअखेरच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात प्रलंबित प्रकरणांची संख्या जवळपास 300 च्या घरात आहे. यामध्ये दर महिन्याला वाढ होत असते. यामुळे या निर्णयाचा राज्यातील नागरिकांना फायदा होणार आहे.

Back to top button