Kolhapur News : धामणीच्या पाणीपातळीत घट; दूषित पाण्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात | पुढारी

Kolhapur News : धामणीच्या पाणीपातळीत घट; दूषित पाण्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात

म्हासुर्ली : पुढारी वृत्तसेवा : धामणी नदीवरील छोट्या छोट्या बंधाऱ्यांत पाणी अडवून केलेला पाणीसाठा सध्या खालावत चालला आहे. मार्चच्या सुरुवातीलाच पाणीपातळीत झपाट्याने होत चाललेली घट ही पुढील दोन महिन्यांसाठी भीषण पाणीटंचाईचे संकेत देत आहे.  त्यातच गेले चार – पाच महिने साचून असणारे पाणी काळपट रंगाचे झाले आहे. पाण्याला काहीसा उग्र स्वरूपाचा वासही येत आहे. त्यामुळे येथील तीसभर गावांसमोर आरोग्याचाही प्रश्न उभा राहिला आहे. पाणीटंचाईतून काहीसे सावरण्यासाठी शासनाने आत्तापासूनच यंत्रणा गतिमान करावी, अशी नागरिकांतून मागणी होऊ लागली आहे. Kolhapur News

धामणी खोऱ्यात दरवर्षीच पाणीटंचाई निर्माण होते. या पाणीटंचाईची दाहकता ही पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणानुसार निर्माण होणाऱ्या भूजल पातळीवर अवलंबून असते. गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले. परिणामी एरवी डोंगरदऱ्यांत वाहणारे छोटे छोटे पाण्याचे स्त्रोतही आटू लागले आहेत. त्यातच नदीतील झऱ्यांद्वारे नदीच्या पाणीसाठ्यात पडणारी भरही थांबली असून झपाट्याने पाणी पातळी घटू लागली आहे. त्यामुळे एकूणच धामणी खोऱ्यातील तीसभर गावे नदीतील पाण्याबरोबरच डोंगरदऱ्यांतील जिवंत पाण्याच्या झऱ्यांवर अवलंबून आहेत. ती पाणीटंचाईच्या भक्षस्थानी पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. Kolhapur News

पाण्याशी निगडीत येथील सर्वच प्रश्न येथे साकारणाऱ्या धामणी मध्यम प्रकल्पाच्या पूर्णत्वाने संपूष्टात येणार आहे. अंतिम टप्यात असणाऱ्या या प्रकल्पाची सप्टेंबरनंतर घळभरणी करुन पुढील वर्षी पाणी अडवण्याचे सुतोवाच अधिकाऱ्यांनी केले आहे. तरीही आजवर लोकांना ग्रासणाऱ्या पाणीटंचाईचा ससेमिरा पुढील एक दोन वर्षासाठी तरी चुकणार नाही. पाणीटंचाई काळात उपाययोजना करण्याबाबत शासनाकडून उदासिनता बाळगली जात असल्याने लोकांना पाणीटंचाईशी संघर्ष करावा लागत आहे.

पाणीटंचाई काळात आधारवड ठरणाऱ्या सार्वजनिक कुपनलिकाही मान टाकतात. काही नादुरुस्त कुपनलिका भूजलपातळी कमी होईल तशा निकामी ठरू लागतात. परिणामी लोकांना पाणी मिळणे दुरापास्त होवून जाते. अशावेळी लोकांना पाण्याच्या शोधात मैलोनमैल भटकंती करावी लागते. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नादुरुस्त असणाऱ्या कुपनलिकांची दुरुस्ती, काही गावांना आवश्यक ठिकाणी नवीन कुपनलिकांची खुदाईकरणे गरजेचे  आहे.

 सध्या नदीत शिल्लक असणाऱ्या पाण्याचा शेतीसाठी वापर होत असला तरी लोक दूषित झालेले पाणी पिण्यासाठी वापरणे टाळत आहेत. त्यासाठी कुपनलिकांसारख्या इतर साधनांचा वापर करावा लागत आहे. येथीलच कुंभारवाडी येथे असणारी सार्वजनिक कुपनलिका देखभाल दुरुस्ती अभावी नादुरुस्त बनली आहे. परिणामी येथील लोकांना नदीचे दूषित पाणीच प्यावे लागत असून येथे जलजन्य आजारांचा उपद्रव होण्याची शक्यता आहे.

Kolhapur News  : काविळीचे थैमाण 

पाण्यापासून निर्माण होणाऱ्या आजारांचा सामना वरचेवर लोकांना करावा लागतो. दोन वर्षापूर्वी बावेली (ता. गगनबावडा) येथे काविळीने थैमान घातले होते. घराघरात रुग्ण वाढत होते. आरोग्य यंत्रणाही खडबडली होती. बऱ्याच प्रयत्नानंतर रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात यंत्रणेला यश आले. मात्र, फैलावणाऱ्या साथीचे मूळ हे पिण्याच्या दूषित पाण्यात होते, हे निष्पन्न झाले. त्यामुळे गावागावांना कायमच भीती  सतावत आहे.

हेही वाचा 

Back to top button