Kolhapur Bribe Case : लाच मागितल्याप्रकरणी जयसिंगपूरच्या तलाठ्यासह लिपिकाला अटक | पुढारी

Kolhapur Bribe Case : लाच मागितल्याप्रकरणी जयसिंगपूरच्या तलाठ्यासह लिपिकाला अटक

जयसिंगपूर: पुढारी वृत्तसेवा : जयसिंगपूर येथे सातबारावर असलेली त्रुटी दूर करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने जयसिंगपुरचा तलाठी स्वप्निल वसंतराव घाटगे (वय 39, रा.रूकडी, ता. हातकणंगले) व तहसील कार्यालयातील लिपिक शिवाजी नागनाथ इटलावर (वय 32, सध्या रा. शाहू कॉलनी, कसबा बावडा, कोल्हापूर, मूळ गाव कुंडलवाडी, ता. बिलोली, जि.नांदेड) यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (दि.26) दुपारी कारवाई करुन अटक केली. Kolhapur Bribe Case

दरम्यान, 27 हजार 500 रुपयाची लाचेची मागणी केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाल्याने पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे शिरोळ तालुक्यातील महसुल विभागात खळबळ उडाली आहे. Kolhapur Bribe Case

याबाबत अधिक माहिती अशी, सांगली जिल्ह्यातील अंजनी येथील तक्रारदार यांची जयसिंगपूर येथील गट नं. 87 मध्ये जमीन आहे. या जमिनीमधील प्लॉटच्या क्षेत्रफळामध्ये तफावत असल्याने क्षेत्रफळाची दुरुस्ती करुन नोंद घालावी. तसा सातबारा उतारा मिळावा, यासाठी तक्रारदार यांनी जयसिंगपूरचे तलाठी घाटगे यांची भेट घेतली होती. त्यावेळी तलाठ्याने 22 हजार रुपयाची मागणी केली. मात्र, हे पैसे शासकीय फी असावी, असे समजून तक्रारदार यांनी दिले होते. त्यानंतर कामाकरिता तलाठी यांची पुन्हा भेट घेतली असता पुन्हा 35 हजारांची मागणी केली.

मात्र, पूर्वी पैसे दिल्याचे सांगितले असता तो प्रोटोकॉलसाठी होता, असे सांगितल्यामुळे तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. 16 नोव्हेंबर व 4 डिसेंबर 2023 रोजी लाचलुचपत विभागाने पडताळणी केली होती. यामध्ये तलाठी घाटगे यांनी क्षेत्रफळाची दुरुस्ती करुन उतारा देण्यासाठी 20 हजार रुपये तसेच तहसील कार्यालयातील लिपिक इटलावार यांच्याकरिता 5 हजार व खासगी टायपिस्ट करिता 2500 रुपये अशी एकूण 27 हजार 500 रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. शिवाय तलाठ्याने सांगितल्याप्रमाणे लिपिक इटलावर यानेही 5 हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते.

त्यानुसार कोल्हापूरच्या लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला, कर्मचारी प्रकाश भंडारे, अजय चव्हाण, विकास माने, सुधीर पाटील, सचिन पाटील, संदीप पवार, सुरज अपराध, विष्णू गुरव यांनी ही कारवाई केली.

Kolhapur Bribe Case  : त्या तलाठ्याची अदला-बदल अन् कारवाईही…

जयसिंगपूर येथील तलाठी अमोल जाधव यांची चार महिन्यापूर्वी इचलकरंजी येथे बदली झाली होती. तर इचलकरंजी येथील तलाठी स्वप्निल घाटगे यांची बदली जयसिंगपूर येथे झाली आहे. दोघांनीही आपल्या पदावर कामकाज सुरु केले होते. अशातच 8 फेब्रुवारीरोजी इचलकरंजीचे तलाठी अमोल जाधव 4 हजारांची लाच घेतल्याने कारवाई करण्यात आली होती. ही घटना ताजी असताना पुन्हा सोमवारी जयसिंगपूरचे तलाठी स्वप्निल घाटगे व लिपिक याने लाचेची केलेली मागणी निष्पन्न झाल्याने घाटगे याच्यावर आज ही कारवाई झाली. त्यामुळे दोघांची इचलकरंजी ते जयसिंगपूर प्रवास आणि दोघेही लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडल्याने दोन्हीही तलाठ्याच्या कारनाम्याने महसूल विभागात चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचा 

Back to top button