कोल्हापूर : राशिवडेत सख्ख्या भावांमधील जमीनवादातून हवेत गोळीबार | पुढारी

कोल्हापूर : राशिवडेत सख्ख्या भावांमधील जमीनवादातून हवेत गोळीबार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दोन सख्ख्या भावांमधील जमिनीच्या वादातून राशिवडे बुदुक (ता. राधानगरी) येथे एकाने हवेत गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. काठ्या, दगड, उसाने करण्यात आलेल्या मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाले. अजित आबासो पाटील (65) व त्यांचा मुलगा अक्षय अजित पाटील (40, दोघेही रा. राशिवडे बुदुक) अशी जखमींची नावे आहेत. या दोघांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान केशव आबासो पाटील, विनायक केशव पाटील, संजय महादेव डकरे, मोहन तुकाराम धुंदरे, विलास आबासो पाटील यांनी मारहाण केली असल्याचे अजित पाटील यांच्या नातेवाईकांनी सांगितले. याबाबत सीपीआर पोलिस चौकीत नोंद झाली आहे.

याबाबत घटनास्थळ व सीपीआर येथून मिळालेली माहिती अशी की, केशव आबासो पाटील व अजित आबासो पाटील हे दोघे सख्खे भाऊ आहेत. या दोघात 42 गुंठे जमिनीवरून वाद सुरू आहे. हा वाद न्यायालयात गेला आहे. या शेतात सध्या ऊस आहे. हा ऊस अजित पाटील यांनी केला आहे. हा ऊस तोडण्यासाठी केशव पाटील, त्यांचा मुलगा व अन्य नातेवाईक असे चौघेजण शेतात गेले होते. त्यावेळी अजित पाटील आणि त्यांचा मुलगा अक्षय हेही त्याच शेतात गेले होते. यावेळी हे दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर जोरदार वादावादी झाली. यावेळी केशव पाटील यांच्याबरोबर आलेल्यांपैकी एकाने हवेत गोळीबार केला.

त्याचवेळी केशव पाटील, त्यांचा मुलगा विनायक, विलास आबासो पाटील व जावई संजय डकरे यांनी अजित पाटील यांच्यावर दगडफेक केली. यामध्ये अजित पाटील यांच्या डोक्यात दगड लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यावेळी अक्षय पाटील हे पुढे आले असता त्यांनाही काट्या, दगड आणि उसाने मारहाण करण्यात आली. जखमींना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

यात्रेदिवशीच गोळीबाराने खळबळ

राशिवडे गावची रविवारी यात्रा होती. याच दरम्यान भावाभावातील वादातून हवेत गोळीबार झाला. याची माहिती गावात समजताच एकच खळबळ उडाली. दरम्यान, यात्रेनिमित्त गावात पोलिस बंदोबस्त होता. हवेत गोळीबार झाल्याचे समजताच गावात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Back to top button