कोल्हापूर : सराफावर हल्ला करून लुटणार्‍या म्होरक्यासह सहाजण गजाआड | पुढारी

कोल्हापूर : सराफावर हल्ला करून लुटणार्‍या म्होरक्यासह सहाजण गजाआड

कोल्हापूर : गुजरी येथील सराफ व्यावसायिक दादा मेटकरी (रा. पुईखडी, कोल्हापूर) यांच्यावर देवकर पाणंद परिसरात हल्ला करून 28.37 लाखांची रोकड लुटणार्‍या म्होरक्यासह सहा साथीदारांच्या जुना राजवाडा पोलिसांनी रविवारी मुसक्या आवळल्या. संशयितांकडून रोख 24 लाख, मोटार, दुचाकीसह पाच मोबाईल असा 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अटक केलेले संशयित शहर परिसरातील सराईत गुन्हेगार आहेत.

रोहित नारायण केसरकर (28, रा. बोंद्रे गल्ली, शिवाजी पेठ, कोल्हापूर), रणजित मधुकर कोतेकर (35, नाना पाटीलनगर, फुलेवाडी रिंगरोड), स्वप्नील सुखलाल ढाकरे (26, राजेंद्रनगर झोपडपट्टी), सौरभ लक्ष्मण शिवशरण (24, राजेंद्रनगर झोपडपट्टी), तुषार जयसिंग रसाळे (28, तस्ते गल्ली, मंगळवार पेठ), ओंकार विजय शिंदे (29, काळकाई गल्ली, शिवाजी पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

केसरकर हा या टोळीचा म्होरक्या आहे. संशयित रसाळे, शिंदे वगळता अन्य चौघे पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. सराफाला लुटण्याच्या गुन्ह्यात आणखी काही संशयितांचा समावेश असावा, असे जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले.

बुधवारी (दि.14) रात्री मेटकरी हे सोने विक्री उलाढालीतील 28 लाख 37 हजाराची रोकड घेऊन मोपेडवरून घराकडे जात असताना संशयितांनी हल्ला करून 28 लाख 37 हजाराची रोकड असलेली बॅग हिसकावून पलायन केले.

भरवस्तीत व्यावसायिकाला लुटल्याने शहरात खळबळ उडाली होती. टोळीचा छडा लावण्यासाठी पोलिस निरीक्षक झाडे यांनी चार शोधपथके नियुक्त केली होती. परिरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध घेण्यात येत होता.

संशयित तुषार रसाळे व ओंकार शिंदे टोळीत सक्रिय असल्याची माहिती मिळाली. म्होरक्या रोहित केसरकर, रणजित कोतेकरसह स्वप्नील ढाकरे, सौरभ शिवशरण यांना गजाआड करण्यात आले. संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून 24 लाख 4 हजाराची रोकड, चार लाख किमतीची मोटार, दुचाकी, 5 मोबाईल असा 28 लाख 13 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक संतोष गळवे, परशुराम गुजरे, सागर डोंगरे, प्रशांत घोलप, अमर पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Back to top button