कुरुंदवाड; जमीर पठाण : खिद्रापूरात ३० रुपयांच्या पार्किंग पावतीसाठी हातकणंगले पोलीस ठाण्यातील होमगार्डने पोलीसी रुबाबात ग्रामस्थ आणि कॉन्ट्रॅक्टरला दमदाटी केली. कारला पोलीस असा बेकायदेशीर फलक लावून या होमगार्डने पोलीस प्रशासनाच्या नावाचा दुरुपयोग केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
खिद्रापूर (ता.शिरोळ) हे शिल्पकलेतील दागिना असलेले कोपेश्वर मंदिराने जगप्रसिद्ध आहे. सध्या मंदिर परिसरात वाहनतळासाठी खासगी ठेका देण्यात आला आहे. बुधवारी दुपारी ४ चाकी येऊन थांबली. पत्नीसह तरुण खाली उतरला पार्किंग ठेकेदाराने त्याच्याकडे रीतसर रक्कम मागितली, त्यावेळी त्याने तुला दिसत नाही का? माझ्या गाडीवर पोलिसाचा फलक आहे, माझ्याकडे पार्किंगचे पैसे कसे मागतोस? असा दम दिला.
ठेकेदाराने पैसे द्यावे लागतील अशी विनंती केली. मात्र माझी पावती फाडणे तुझ्या अंगलट येईल. तुला काय करायचे ते कर, अशा शब्दात त्या तरुणाने खाकी वर्दीची भीती घातली अन् तो पत्नीसह मंदिरात गेला. अचानक घडलेल्या या प्रसंगाने ठेकेदाराचा रक्तदाब वाढला त्याच्या मदतीला ग्रामस्थ धावले. दम दिलेल्या कथित पोलीस तरुणाचा ग्रामस्थांना संशय आला. दर्शन घेऊन जाताना तरुणाने ठेकेदाराला माझ्या गाडीचा नंबर आणि माझ नाव लिहून घे असे सांगितले. त्याच्या उर्मटपणामुळे आधीच संतप्त झालेल्या जमावातील एका ग्रामस्थाने त्याला कोण तू? पोलीस काय लागून गेलास? अशी सरबत्ती केली. मात्र डोक्यात पोलिसाचा रुबाब भिनल्याने तुम्हाला पोलीसी खाक्या दाखवतो, असा पुन्हा दम दिला.
संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. कुरुंदवाड पोलिसांनी त्यांना फोन द्या असे सांगितले. त्यावेळी त्या तरुणाने हातकणंगले पोलीस स्टेशनमध्ये असल्याचे पोलिसांना सांगितले. ग्रामस्थांनी हातकणंगले पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता गोपनीय विभागाचे संग्राम पाटील यांनी तो पोलीस नाही होमगार्ड आहे, असे सांगितले. यानंतर त्या तरूणाने तिथून काढता पाय घेतला.
हातकणंगले पोलीस ठाण्याच्या होमगार्डने आपल्या चारचाकीला पोलीस असा बेकायदेशीर फलक लावून पोलीस प्रशासनाच्या नावाचा दुरुपयोग केल्याचे उघडकीस आले आहे. ठेकेदारासह ग्रामस्थांना अरेरावी करीत पोलिसी खाक्या दाखविण्याचा केलेला रुबाब निंदनीय व केविलवानी ठरला. ३० रुपयाची पावती न फाडता उलट दमदाटी करून खात्यालाच बदनाम केले. या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, अशी ग्रामस्थ करत आहेत.
हेही वाचा :