शाहूवाडीत दवाखान्यांच्या तपासणीसाठी मंडलनिहाय 6 पथकांची नियुक्ती

file photo
file photo

सरूड : पुढारी वृत्तसेवा शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये अवैधरित्या होणारे गर्भपाताचे प्रकरण जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाने नुकतेच उजेडात आणले. या धक्कादायक प्रकारामुळे तालुक्याची मान निश्चितच शरमेने खाली गेली आहे. याची शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी गंभीर दखल घेतली आहे. तालुक्यातील दवाखान्यांच्या तपासणीसाठी मंडलनिहाय सहा पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी आरोग्य विभागाचीही मदत घेण्यात आली आहे.

तालुक्यातील सर्व दवाखान्यांची विशेषतः सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करण्याची गरज ओळखून सरूड, मलकापूर, भेडसगांव, बांबवडे, करंजफेण, आंबा अशा एकूण सहा सर्कलमध्ये कार्यरत मंडल अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येकी सहाजणांचे तपासणी (भरारी) पथक नियुक्त केले आहे. यामध्ये अव्वल कारकून, आरोग्य सहायक (२), तलाठी (२) यांचा समावेश करण्यात आला आहे असे तहसीलदार चव्हाण यांनी सांगितले.

दरम्यान नियुक्त तपासणी पथकांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात सोनोग्राफी करणारे सर्व दवाखाने, संशयित केंद्रांच्या ठिकाणी अचानक भेट देऊन गोपनीयरीत्या तपासणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील बोगसगिरीला आळा बसणार आहे. तसेच तालुका आरोग्य विभागाने या तपासणी पथकांना आवश्यक तांत्रिक साधन साहित्य पुरवावे तसेच सहाही तपासणी पथकांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल स्वीकारून आपल्या अभिप्रायासह तहसील कार्यालयास सादर करावा, असे आदेश तहसीलदार चव्हाण यांनी तालुका आरोग्यधिकारी डॉ. निरंकारी यांना दिले आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news