Marriage Story : ८० वर्षांचा नवरा… ६५ वर्षांची नवरी! जाखलेत पार पडला अनोखा विवाह | पुढारी

Marriage Story : ८० वर्षांचा नवरा... ६५ वर्षांची नवरी! जाखलेत पार पडला अनोखा विवाह

वारणानगर : पुढारी वृत्तसेवा :  ऐंशी वर्षांचा नवरा… अन् पासष्ट वर्षांची नवरी… या ज्येष्ठ नागरिकांचा जाखले (ता. पन्हाळा) येथे नुकताच झालेला अनोखा विवाह कौतुकाचा ठरू लागला आहे. भास्कर बंडू गायकवाड व कमल नामदेव पाटील, असे या नवदाम्पत्याचे नाव आहे. या अनोख्या विवाह सोहळ्याचे वारणा परिसरात कौतुक होऊ लागले आहे. (Marriage Story )

Marriage Story : जातीपातीच्या भिंती तोडून…

मुले नोकरीनिमित्त मुंबईला असल्यामुळे भास्कर गायकवाड जाखले येथे एकटेच राहतात. त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटण्याबरोबर वार्धक्यात जोडीदाराचा आधार मिळावा म्हणून विवाह संस्थेत नोंदणी केली होती. सर्व नातेवाईक आले, बोलणी केली आणि जातीपातीच्या भिंती तोडून २०२३ या सरत्या वर्षाला अखेरचा निरोप देत ‘भास्करा’च्या साक्षीने नातेवाईकांसह ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली.
जाखले येथील भास्कर बंडू गायकवाड हे मुंबई येथे खासगी कंपनीत कामाला होते. निवृत्तीनंतर ते गावी राहण्यास आले. त्यांना एक मुलगा, दोन विवाहीत मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पत्नीचे १४ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. मुलगा आणि मुली कामानिमित्त मुंबई येथे स्थायिक आहेत. गायकवाड गावी एकटेपण अनुभवत होते. ते जेवण स्वतः करून किंवा शेजाऱ्यांकडे मागून पोट भरत होते. त्यांच्या मुलींनी वडिलांचे लग्न करायचे ठरवले. मनपाडळे येथील सागर वाघमारे यांच्या वधू-वर सुचक मंडळाकडे नोंदणी केली. त्यांनी अवनी ट्रस्ट कोल्हापूर येथे संपर्क साधून कमल पाटील यांच्याकडे विचारणा केली. आठ दिवसांत बघण्याचा कार्यक्रम झाला आणि विवाह निश्चित केला. कमल पाटील या मूळच्या सांगली जिल्ह्यातील तासगावच्या. पती दहा वर्षांपूर्वी वारले. मुलबाळ नसल्याने आठ वर्षांपासून त्या अवनि संस्थेत राहत होत्या.

३१ डिसेंबरच्या दुपारी जाखले येथे हा विवाह सोहळा घरगुती पद्धतीने थाटात पार पडला. यावेळी केखलेच्या माजी सरपंच उषा कांबळे, मीना कांबळे, बेबी हिरवे, शोभा कांबळे, लता शिंदे, सुनीता गायकवाड, आनंदा गायकवाड, जयश्री मोहिते, विश्वास गायकवाड, तानाजी गायकवाड, बाजीराव गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ, नातेवाईक उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button