एसटी संपाचा परिणाम : भावी शिक्षकांची ‘टीईटी’ परीक्षेची वाट बिकट? | पुढारी

एसटी संपाचा परिणाम : भावी शिक्षकांची ‘टीईटी’ परीक्षेची वाट बिकट?

कोल्हापूर : प्रवीण मस्के

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवारी राज्यभर शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) आयोजन करण्यात आले आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संपामुळे अनेक उमेदवारांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे काहीजण परीक्षेला मुकण्याची शक्यता आहे.

गेली तीन वर्षे ‘टीईटी’ परीक्षा झाली नसल्याने पात्र उमदेवार चिंतेत होते. यापूर्वी वेगवेगळ्या कारणांमुळे टीईटी परीक्षा पुढे ढकलली होती. उशिरा का होईना यंदा 21 नोव्हेंबर रोजी परीक्षा घेण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्?ह्यातील सुमारे 33 केंद्रांतून सुमारे 17 हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. यंदा होणार्‍या परीक्षेला मात्र एस. टी. कर्मचारी संप अडचण ठरणार आहे.

शहरासह ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी टीईटी परीक्षेला बसणार आहेत. काही उमेदवारांनी इतर जिल्ह्यातील परीक्षा केंद्र निवडले आहे. त्यांना परीक्षेसाठी ये-जा करण्यासाठी इतर खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागणार आहे. एस.टी. कर्मचार्‍यांच्या संपामुळे खासगी वाहतुकीने परीक्षेला जाणे अनेकांना परवडण्यासारखे नाही.

प्रत्येक परीक्षार्थी हा सधन कुटुंबातील नसल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रास सहन करावा लागणार आहे. मागील वेळेस देगलूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमुळे टीईटी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला होता. मात्र, एस.टी. संपाच्या पार्श्वभूमीवर अनेक डी.एड., बी.एड. पात्रताधारकांना परीक्षेला पोहोचण्यासाठी विलंब झाल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता उमेदवारांनी व्यक्त केली आहे.

अगोदरच टीईटी परीक्षेला उशीर झाला आहे. एस. टी. कर्मचार्‍यांच्या संपामुळे परीक्षेला जाताना अडचणीचे ठरणार आहे. टीईटी व नेट या दोन परीक्षा एकाचवेळी आल्याने विद्यार्थ्यांसमोर कोणती परीक्षा द्यावी, हा प्रश्न असणार आहे. बस वाहतूक ही सर्वसामान्यांची गरज आहे. याचा विचार करून शासनाने एस.टी.चा संप मिटल्यावर परीक्षा घेऊन पात्र उमेदवारांना संधी द्यायला हवी.

– कुलदीप कामत, टीईटी परीक्षार्थी

पाहा व्हिडिओ : सिद्धार्थ चांदेकरच्या घरची पाल पर्मनंट सदस्य

Back to top button