कोल्हापूर-तिरुपती मार्गावर दररोज विमानसेवा | पुढारी

कोल्हापूर-तिरुपती मार्गावर दररोज विमानसेवा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

सध्या आठवड्यातून चार दिवस सुरू असलेली कोल्हापूर-तिरुपती या मार्गावरील विमानसेवा दररोज सुरू राहणार आहे. हा नवा बदल एक डिसेंबरपासून अंमलात येणार आहे. कोल्हापूर विमानतळाचे संचालक कमल कटारिया यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील मंदिर भाविकांसाठी बंद होती. यामुळे दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांच्या संख्येवर मर्यादा आली होती. या सर्वांचा फटका कोल्हापूर-तिरुपती मार्गावरील विमानसेवेलाही बसला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर कोल्हापूर-तिरुपती मार्गावरील विमानसेवा सुरू करण्यात आली. मात्र, दररोज असणारी ही सेवा केवळ सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार अशी आठवड्यातील चार दिवस सुरू होती.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने मंदिरे खुली करण्यात येत आहेत. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरासह तिरुपती येथील मंदिरातही दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. यामुळे कोल्हापूर-तिरुपती मार्गावरील प्रवाशी संख्येतही पूर्वीप्रमाणेच वाढ होत असल्याने आता या मार्गावरील सेवा एक डिसेंबरपासून दररोज सुरू होणार आहे.

यापूर्वी हैदराबाद-कोल्हापूर-तिरुपती आणि तिरुपती-कोल्हापूर-हैदराबाद अशी फ्लाईट होती. मात्र, मार्गावर मिळणारा प्रतिसाद पाहून कंपनीने तिरुपती-कोल्हापूर आणि कोल्हापूर-तिरुपती अशी फ्लाईट सुरू केली आहे. आता दि.1 डिसेंबरपासून ती दररोज सुरू राहणार आहे. या मार्गावर बुकिंगलाही प्रतिसाद मिळत असून काही तारखेचे प्रवासी भाडे दहा हजारांवर गेले आहे.

वेळा

मार्ग         प्रस्थान          आगमन
तिरुपती – कोल्हापूर       दु.12.05 दु. 1.50
कोल्हापूर-  तिरुपती       दु.2.20 दु.4.00

 

पाहा व्हिडिओ : मिलिंद तेलतुंबडे नक्षलवादी कसा बनला

Back to top button