शिवसेनाप्रमुखांना मुंबई महापालिका सभागृहात जागा नाही | पुढारी

शिवसेनाप्रमुखांना मुंबई महापालिका सभागृहात जागा नाही

“मुंबई : पुढारी वृत्तसेवा” image=”http://”][/author]

मुंबई महापालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात अन्य नेत्यांच्या पुतळ्यांसह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसवण्यास पालिका प्रशासनाने स्पष्ट नकार दिला आहे

.मुख्य सभागृहातील अन्य नेत्यांच्या पुतळ्यांच्या रांगेत आणखी पुतळा बसवण्यास जागाच शिल्लक नसल्याचे सांगत पालिका प्रशासनाने शिवसेनाप्रमुखांचा पुतळा पालिका सभागृहात बसवण्यास नकार दिला आहे. सभागृहात शिवसेनाप्रमुखांना जागा नाही, असे एकीकडे सांगताना पुतळा बसवायचाच असेल तर, तो स्थायी किंवा अन्य समिती सभागृहात बसवण्यात यावा, असा पर्यायदेखील प्रशासनाने सुचवला आहे.

मुंबई महापालिका ऐतिहासिक सभागृहात नगरसेवकांसह अधिकार्‍यांना बसायलाही जागा अपुरी पडत आहे. त्यात सभागृहात बसवण्यात आलेल्या नेत्यांच्या पुतळ्यांमुळे जागा अधिकच व्यापली गेली आहे. अशा परिस्थितीत या सभागृहात शिवसेनाप्रमुखांचा पुतळा बसवण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे शिवसेनेने केली होती. त्यावर प्रशासनाने आता लेखी अभिप्राय दिला आहे.

सध्या सभागृहात हात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह 13 पुतळे आहेत. उपलब्ध क्षेत्रफळाच्या जागेमध्ये 247 जणांच्या बैठकीची व्यवस्था आहे. आता अजून 9 नगरसेवक वाढणार असल्यामुळे सध्याचे ऐतिहासिक सभागृह अपुरे पडणार आहे. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वि.वा. शिरवाडकर, सावित्रीबाई फुले यांच्यासह विविध मान्यवरांचे पुतळे बसवण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत असली तरी नवीन अर्धपुतळ्यांसाठी जागा उपलब्ध होण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही.

त्यामुळे महापुरुषांचे नवीन पुतळे पालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृह व अन्य समिती सभागृहात लावण्यात यावेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सध्या बसवलेल्या पुतळ्यांपैकी कोणताही पुतळा शिवसेनाप्रमखांसाठी हटवला जाणे शक्य नसल्याने शिवसेनाप्रमुखांच्या पुतळ्याला स्थायी समितीमध्ये विराजमान व्हावे लागणार आहे. नवे पुतळे नेमके कुठे बसवावेत यासंदर्भात लवकरच सर्व पक्ष गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

 

Back to top button