कोल्हापूर : अद्ययावत 1 हजार आसन क्षमतेचे नाट्यगृह होणार कधी?

कोल्हापूर : अद्ययावत 1 हजार आसन क्षमतेचे नाट्यगृह होणार कधी?

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात सध्या सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाटक करायची कोठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. केशवराव भोसले नाट्यगृह हा एकच पर्याय सध्या आपल्याकडे आहे. येथे अनेकवेळा सर्व तारखा बुक झालेल्या असतात. त्यानंतर शाहू स्मारकमध्येही नियोजित कार्यक्रम असतात. त्यामुळे एखादा चांगला सांस्कृतिक कार्यक्रम, गाण्यांचे कार्यक्रमांसाठी नाट्यगृहच उपलब्ध नसल्याने अनेक चांगल्या कार्यक्रमांपासून कोल्हापूरकरांना वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांसाठी नव्या अद्ययावत किमान एक ते दोन हजार आसनक्षमता असलेल्या नाट्यगृहासाठी जागेचा शोध घ्यावा लागणार आहे. निधीसाठी लोकप्रतिनिधींनी पुढे येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे.

कलानगरी म्हणून कोल्हापूरचा उल्लेख केला जातो; पण या कलानगरीतच कलेची उपेक्षा होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मध्यंतरी केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात आले. खुर्च्यांसह सर्व व्यवस्था बदलण्यात आली. अद्ययावत साऊंड सिस्टीमसह अनेक नव्या बाबी केल्या. यावर राज्य शासनाने सुमारे 6 ते 7 कोटी रुपये खर्च केले आहेत. केशवराव भोसले नाट्यगृहाचा दुसरा टप्पा केला जाणार आहे. तसा प्रस्ताव प्रलंबित आहे. परंतु, त्याचा पाठपुरावा सध्या होत नाही. हे काम खोळंबले आहे.

नव्या अद्ययावत 1 हजार ते 2 हजार आसन क्षमतेच्या नाट्यगृहाची अनेकदा चर्चा झाली. परंतु, तो विषय नेहमी मागेच राहिला. शाहू मिलच्या जागेत होणार्‍या आंतरराष्ट्रीय शाहू स्मारकाच्या ठिकाणी अशा प्रकारचे एखादे नाट्यगृह उभारण्याचा पर्याय होता. प्रस्तावात तो समाविष्टदेखील झाला आहे. परंतु, हे कामदेखील खोळंबले आहे. शासकीय पातळीवर याबाबत कोणतीही हालचाल झालेली नाही. याची केवळ घोषणा झाली. परंतु, अंमलबजावणी झालेली नाही. मोठे नाट्यगृह ही कोल्हापूरची गरज आहे; पण याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही.

बाजार समितीतील शाहू सांस्कृतिक मंदिर बंद

पूर्वी मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक मंदिरचा एक पर्याय होता. परंतु, ही इमारत खूपच जुनी झाली आहे. या सभागृहाची मालकी बाजार समितीकडे आहे. याच जागेत चांगले अद्ययावत दर्जेदार नाट्यगृह होऊ शकते. बाजार समिती स्थानिक नेतृत्वाकडेच आहे. सर्व राजकीय पक्षांचा त्यामध्ये समावेश आहे. जे महापालिकेचे नेतृत्व करण्यात आघाडीवर असतात, तेच बाजार समितीचेही नेतृत्व करतात. नव्या नाट्यगृहासाठी हा देखील एक पर्याय उपलब्ध होऊ शकतो किंवा बाजार समितीने या इमारतीचे नूतनीकरण केले, तर हा त्यांच्या उत्पन्नाचा एक मार्ग बनू शकतो. त्याद़ृष्टीने पर्यायाबाबत विचार व्हायला हवा.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news