Kolhapur News : थेट पाईपलाईनला तुरंबेनजीक मोठी गळती | पुढारी

Kolhapur News : थेट पाईपलाईनला तुरंबेनजीक मोठी गळती

तुरंबे, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरासाठी पाणीपुरवठा करणार्‍या थेट पाईपलाईनला तुरंबे-कपिलेश्वरनजीक मोठ्या प्रमाणात गळती लागली. सकाळी फिरण्यासाठी जाणार्‍या गावकर्‍यांना पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर येत असल्याचे दिसले. पाण्याचा आवाज मोठा येत असल्यामुळे घटनास्थळाजवळ जाण्याचे धाडस कोणी करत नव्हते. यामध्ये लाखो लिटर पाणी वाया गेले. (Kolhapur News)

दरम्यान, ठेकेदार कंपनीकडून गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले. (Kolhapur News)

कोल्हापूरला शिंगणापूरमधून पाणीपुरवठा सुरू

काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनच्या दोन पंपांद्वारे पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू झाला होता. गळती लागल्याने थेट पाईपलाईनचा पाणीपुरवठा पूर्ण बंद करण्यात आला. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. परिणामी, गुरुवारी सकाळी 8 वा. शिंगणापूर उपसा केंद्र पुन्हा सुरू करण्यात आले. या केंद्रातील चार पंपांबरोबरच कसबा बावडा केंद्रातील एक पंप सुरू झाला. त्याद्वारे शहरात पाणीपुरवठा करण्यात आला.

थेट पाईपलाईनची गळती काढून पाणीपुरवठा सुरू होईपर्यंत आता शहराला पूर्वीसारखाच म्हणजे शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी उपसा केंद्रांद्वारे पंचगंगा आणि भोगावती नदीतून पाणी देण्यात येणार आहे. गळती लागली की, संपर्क करायचा कोणाशी? यासाठी पाईपलाईन मार्गावरील ठरावीक अंतरावर पाईपलाईनसंदर्भात एखादी घटना घडल्यास संपर्क साधण्यासाठी संपर्क पाट्या लावणे गरजेचे असल्याचे मत स्थानिक लोकांनी व्यक्त केले.

हेही वाचा :

Back to top button