कोल्हापूर : वडणगे येथे लोकसहभागातून साकारले क्रीडांगण | पुढारी

कोल्हापूर : वडणगे येथे लोकसहभागातून साकारले क्रीडांगण

वडणगे; पुढारी वृत्तसेवा : कोणत्याही शासकीय निधीची वाट न पहाता वडणगे (ता.करवीर) येथील ग्रामस्थ, खेळाडू व क्रीडाप्रेमी तरूणांनी एकत्र येऊन लोकवर्गणीतून गावासाठी सुसज्य क्रीडांगण साकारले आहे. आज (दि.१७) सायंकाळी ६ वाजता येथील शिव-पार्वती क्रीडांगणाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

पंचवीस हजारहून अधिक लोकसंख्या असलेल्या वडणगे गावात सुसज्ज असे क्रीडांगण नव्हते. येथील सर्व्हे नंबर ६१० मधील सुमारे एक हेक्टर गायरान जमिनीचा येथील खेळाडू गेल्या अनेक वर्षापासून मैदान म्हणून वापर करीत होते. या मैदानाला अनेक खाच -खळगे, चढ-उतार असल्याने क्रिकेट, फुटबॉल व अन्य खेळाडूंना सराव करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे गावातल्या तरुणांनी या मैदानाचे नोव्हेंबर २०२२ मध्ये लोकसहभागातून सपाटीकरण सुरु केले. क्रीडांगणाच्या कामासाठी खर्च मोठा होता. या कामासाठी तरुणांनी शिव-पार्वती क्रीडांगण समितीची स्थापना केली. या समितीच्या वतीने प्रसार माध्यम व सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रीडांगणाच्या कामासाठी मदतीचे आवाहन केले. त्यानंतर गावातील ग्रामस्थ, क्रीडाप्रेमी व बाहेरील अनेक दानशूर लोकांनी या कामासाठी आर्थिक व अन्य स्वरूपात मदत केली.

क्रीडांगणाचे सपाटीकरण करण्यासाठी करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजू सुर्यवंशी, अयोध्या डेव्हलपरचे व्ही.बी.पाटील, कोल्हापूर बुलडोझर असोसिएशनचे आर.आर. पाटील, वडणगेतील व्यावसायिक सर्जेराव माने यांनी आपले जेसीबी, रोलर, बुलडोझर, डंपर देऊन सहकार्य केले. तसेच क्रीडाप्रेमी मोहन खडके, अरुण नांगरे , बी. एच. दादा युवक मंच यांनी रोख स्वरूपात भरीव निधी दिला. वडणगे ग्रामपंचायतीने संपूर्ण मैदानावर पाणी फवारणीची यंत्रणा बसवली. याचबरोबर हे क्रीडांगण साकारण्यासाठी वडणगेतील शिव-पार्वती क्रीडांगण समिती, ग्रामस्थ, खेळाडू व  क्रीडाप्रेमी तरुणांनी कामाच्या नियोजनापासून श्रमदानापर्यंत मदत केली. अद्याप या क्रीडांगणाभोवती संरक्षक भिंत, प्रवेशद्वार, स्वच्छतागृह, हाय मास्ट दिवे, व्यासपीठ, कार्यालय इत्यादी कामे प्रस्तावित आहेत. आणखी निधी जमा होताच उर्वरित कामे पूर्ण केली जाणार आहेत.

क्रीडांगणाचा लोकार्पण सोहळा वडणगेच्या लोकनियुक्त सरपंच संगीता पाटील, व्ही.बी.पाटील, चंद्रदीप नरके, राजेंद्र सूर्यवंशी, आर. आर. पाटील, बी.एच.पाटील, बाजीराव पाटील, इंद्रजित पाटील, सचिन चौगले, शक्ती खाडे, समीर नलवडे यांच्या उपस्थितीत झाले.

शासन निधीची वाट न पहाता साकारले क्रीडांगण

वडणगेत एकमेव रिकामी असलेल्या येथील जागेवर क्रीडांगणाचे आरक्षण टाकल्याशिवाय या जागेला क्रीडांगण म्हणून विकसित करण्यासाठी शासनाचा निधी मिळत नाही. या जागेवर क्रीडांगणाचे आरक्षण टाकावे, अशी खेळाडूंसह क्रीडाप्रेमींची अनेक वर्षापासूनची मागणी होती. यासाठी ग्रामपंचायतीने २० डिसेंबर २०१२ ला ठराव केला आहे. मात्र त्यानंतर गेल्या दहा वर्षात यासाठी लोकप्रतिनिधींकडून कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे कोणत्याही शासन निधीची वाट न पाहता वडणगेकरांनी लोकसहभागातून एक सुसज्य क्रीडांगण साकारले आहे.

क्रीडांगणाप्रमाणे तलावाचेही काम व्हावे

गावातील ग्रामस्थ व तरुणांनी ठरवले तर एखादे काम लोकसहभागातून कसे होऊ शकते. याचे वडणगे येथील शिव-पार्वती क्रीडांगण हे एक उत्तम उदाहरण आहे. क्रीडांगणाबरोबर वडणगे येथील शिव-पार्वती तलाव हे गावचे नैसर्गिक वैभव आहे. आज या तलावाची सांडपाण्यामुळे मोठी दुरावस्था झाली आहे. भविष्यात या तलावाकडे दुर्लक्ष झाल्यास तलावाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. शासनाचा निधी मंजूर होऊनही तलावाच्या सुशोभिकरणाचे काम रखडले आहे.आता शासनाच्या निधीची वाट न पहाता क्रीडांगणाप्रमाणे तलावाचेही काम ग्रामपंचायत व लोकसहभागातून व्हावे, अशी सर्वसामान्य ग्रामस्थांची इच्छा आहे.

हेही वाचा :

Back to top button