कोल्हापूर : ‘कनवा’मध्ये होणार अंबाबाईच्या साड्यांची विक्री | पुढारी

कोल्हापूर : ‘कनवा’मध्ये होणार अंबाबाईच्या साड्यांची विक्री

कोल्हापूर : पूनम देशमुख

करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या प्रसादाच्या साड्या करवीर नगर वाचन मंदिर शेजारील हॉलमध्ये लवकरच खरेदी करता येणार आहेत. नवरात्रीत मंदिरे पुन्हा उघडल्यावर कोरोना काळात सुरक्षेच्या कारणास्तव गर्दी टाळण्यासाठी या साड्यांची विक्री त्र्यंबोली टेकडीवर करण्यात येत होती; मात्र बाहेरून येणार्‍या भाविकांना त्याबाबत माहिती होत नसल्याने प्रसादाच्या साड्यांची विक्री मंदिर परिसरानजीक असणार्‍या ‘कनवा’च्या हॉलमध्ये केली जाणार असल्याचे देवस्थान समिती सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणारी अंबाबाई असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. देवीच्या दर्शनासाठी येताना भाविक साडी, चोळी खणा-नारळाची ओटी देवीला अर्पण करतात. अशा हजारो साड्या देवस्थान समिती आणि पुजार्‍यांकडे येतात. मंदिर बंद असतानाही देवीला साड्या वाहण्यात आल्या; मात्र त्याचे प्रमाण काहीसे घटले होते. वर्षानुवर्षे देवीला येणार्‍या या साड्या देवस्थान समितीकडे तशाच आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत देवीला अर्पण केलेल्या साड्या मंदिर परिसरातील व्यापारी एकदम खरेदी करून पुन्हा भाविकांना विकत होते; मात्र व्यापार्‍यांचा एकदम साड्या घेण्याचा प्रस्ताव नाकारत समितीने भक्तांसाठी देवीच्या साड्यांचे दालन खुले केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने साड्यांची विक्री बंद होती. मात्र, नवरात्रीत मंदिरे पुन्हा उघडल्यावर सुरक्षिततेच्या कारणास्तव मंदिर परिसरातच होणारी साड्यांची विक्री त्र्यंबोली टेकडीवर करण्यात आली. हे ठिकाण शहराच्या एका टोकाला असल्यामुळे बाहेरून येणार्‍या भाविकांना त्याचा लाभ घेता येत नव्हता. भाविकांची हीच अडचण लक्षात घेत समितीने पुन्हा प्रसादाच्या साड्यांची विक्री मंदिर परिसरानजीक करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार करवीर नगर वाचन मंदिरमधील हॉलचे बांधकाम आठवडाभरात पूर्णत्वास येत असून तेथे लवकरच प्रसादाच्या साड्यांची विक्री केली जाणार आहे. दरम्यानच्या मार्गावर भाविकांची सतत वर्दळ असल्याने याचा लाभ देवस्थान समितीला होणार आहे.

पवार म्हणाले, चंद्रकांत पाटील यांच्याकडे दुर्लक्ष, फडणवीस सत्ता गेल्याने अस्वस्थ

अंबाबाईला अर्पण केलेल्या दशकभरातील साड्यांचा हा साठा संपेपर्यंत त्याची विक्री केली जाणार आहे. साडीची 60 टक्के रक्कम आकारत भाविकांना देण्यात येणार्‍या साडीच्या क्रमांकाची नोंद ठेवण्यात येते. त्याची रितसर पावतीही देवस्थान समितीकडून देण्यात येते.

– शिवराज नाईकवाडे, सचिव, देवस्थान समिती

Back to top button